गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांचे पूर्ण तयारीनिशी आगमन : डाॅ. बी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:24+5:302021-09-08T04:38:24+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांनी सुरक्षित जिल्ह्यात यावे, यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात पाच ...
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांनी सुरक्षित जिल्ह्यात यावे, यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात पाच प्रवेश नाके निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी या ठिकाणी कोरोना चाचणी होणार नाही. मात्र, सर्व मार्गांहून आलेल्या प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविली जाणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतलेले नसतील किंवा कोरोना चाचणी केलेली नसेल, अशांची मुक्कामी पोहोचल्यानंतर आरटीपीसीआर अथवा अँटिजन चाचणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूमती जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) राजश्री मोरे उपस्थित होते.
आतापर्यंत जिल्हयात ४८८७ नागरिक जिल्ह्यात विविध मार्गांनी आले आहेत. त्यापैकी १७७३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतले असून १२७८ जणांनी अँटिजन, तर १८२२ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. उर्वरित केवळ १४ जणांचीच चाचणी करावी लागली. यात ६ जण पाॅझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, लोकांमध्ये आता जागरूकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांशी नागरिक तयारीनिशी येत असून लसचे दोन्हीही डोस घेऊन किंवा आधीच कोरोना चाचणी करून घेत आहेत. त्यामुळे गावी येणाऱ्यांपैकी केवळ ५ ते ६ टक्के लोकांचीच चाचणी करावी लागत आहे. लोकांनाही आपल्या घरच्यांची किंवा आप्तांची काळजी असल्याने चाचणीसाठी त्यांचा कुठलाही विराेध नसल्याचे ही त्यांनी सांगितले.
गावांमध्ये किंवा शहरांमध्ये कृती दले कार्यरत झाली असून गावाेगावी सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गावी आलेल्यांनी डोस घेतलेत का, कोरोना चाचणी झालीय का याची माहिती घेत आहेत. न केलेल्यांची आरटीपीसीआर स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. चाचणीसाठी मोबाईल आरोग्य पथके कार्यरत आहेत. लक्षणे असतील त्यांनाच विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने गणेशोत्सव सुरक्षितरीत्या साजरा व्हावा, यासाठी सर्वांना कोरोना नियमांचे पालन करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. मात्र, जे त्याचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, जिल्हा प्रशासन तिसऱ्या लाटेशी सामना करण्याची तयारी करत आहे. जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया कुणाला त्रास देण्यासाठी नाही तर लोकांना सुरक्षित ठेवून सर्व सण साजरे व्हावेत, या उद्देशाने लोकसहभागाने प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना चाचणी सुविधा..
गावी येण्यापूर्वीच ज्यांना प्रवास करण्याआधी चाचणी करता यावी, यासाठी बसस्थानके, रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळत असून लोक चाचणीसाठी रांगेत उभे रहात आहेत.
घाटांमध्ये सूचना फलक...
महाड ते राजापूर या मार्गांवरील आठ घाटांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून दिशादर्शक फ्लेक्स लावण्यात येत आहेत. हे काम ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम दोन दिवसांत पूर्ण होईल, तसेच महामार्गावरील झाडी, गवत तोडण्यात येत आहे. या ठिकाणी क्रेन, टोईंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.