रत्नागिरीत आर्ट सर्कलतर्फे जानेवारीत कला संगीत महोत्सव, विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची-पाहण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:27 PM2018-01-01T13:27:14+5:302018-01-01T13:34:12+5:30
रत्नागिरीतील आर्ट सर्कलच्या ११व्या कला संगीत महोत्सवाची थिबा पॅलेस येथे पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. दिनांक २६ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची आणि पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कलच्या ११व्या कला संगीत महोत्सवाची थिबा पॅलेस येथे पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. दिनांक २६ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या कला संगीत महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची आणि पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात नव्या दमाच्या प्रसिद्ध गायिकाद्वयी शमिका भिडे आणि स्वरांगी मराठे यांच्या युगल गायनाने होईल. त्यानंतर शंकरराव टेंगशे स्मृती मैफिलीमध्ये पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता सारंगी व जोरी यांच्या जुगलबंदीने होणार असून, प्रसिद्ध सारंगिये संगीत मिश्रा आणि तबलावादक सुखविंदर सिंग नामधारी आपली कला सादर करतील. जोरी हे तबल्याचे मूळ स्वरूप असून, त्याला पंजाबी पखवाज असेही म्हटले जाते. कै. शंकरराव टेंगशे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस सर्व रसिकांसाठी विनामूल्य राहील.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. २७ जानेवारी रोजी सरोद वादनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. प्रसिद्ध सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार सरोद वादन सादर करणार असून, सत्यजित तळवलकर त्यांना तबला साथ करतील.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विशाल कृष्ण आणि रागिणी महाराज यांचे कथ्थक नृत्य होईल. विशाल कृष्ण हे बनारस घराण्याचे नर्तक असून, ते प्रसिद्ध नर्तिका सितारा देवी यांचे नातू आणि पं. गोपी कृष्ण यांचे पुतणे आहेत. रागिणी महाराज या प्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांची नात व शिष्या आहेत.
महोत्सवाचा तिसरा दिवस सतारवादन आणि शास्त्रीय गायनाने रंगणार असून, पं. पूर्बायन चॅटर्जी यांचे सतारवादन आणि प्रसिद्ध गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
महोत्सवाची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. डॉ. अत्रे या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका असून, विदुषी, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, संशोधिका आणि गुरु असा त्यांचा लौकिक आहे.