जिल्ह्यात ३० हजार जनावरांचे हाेणार कृत्रिम रेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:20+5:302021-07-07T04:38:20+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र साहाय्यित (६०:४०) ...

Artificial insemination of 30,000 animals in the district | जिल्ह्यात ३० हजार जनावरांचे हाेणार कृत्रिम रेतन

जिल्ह्यात ३० हजार जनावरांचे हाेणार कृत्रिम रेतन

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र साहाय्यित (६०:४०) राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रीयस्तरावर गायी व म्हैशीमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम आखण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ३० हजार १२८ गायी व म्हशींची संख्या असून, सर्वांचे कृत्रिम रेतन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय साहाय्यता ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के तसेच राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांना क्षेत्रिय स्तरावर गायी, म्हशीमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कृत्रिम रेतनापासून दरवर्षी १२ ते १३ लक्ष वासरांची पैदास होते. कृत्रिम रेतनाचे कार्य राज्यातील पशुसंवर्धन विभागाअंतर्गत ४,८४७ शासकीय कृत्रिम रेतन संस्था व राज्यातील सहकारी दुधसंघ, अशासकीय संस्था यांच्या टीम रेतन व खासगी कृत्रिम रेतन व्यावसायिकांद्वारे केले जाते. कृत्रिम जन्मणाऱ्या एकूण वासरामध्ये निसर्ग नियमांनुसार सरासरी ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरांचे प्रमाण असते. नर वासरांची उत्पत्ती उत्तम पातळीवर ठेवण्याच्या हेतूने पारंपरिक वीर्यमात्रेऐवजी लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मितीचा पर्याय वापरण्यात येणार आहे.

वीर्यमात्रांचा क्षेत्रियस्तरावर गायी, म्हशीमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर केल्यास त्यानुसार ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

पशुधन विकास मंडळाने लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा करण्यासाठी कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीतर्फे अल्पदरात वीर्यमात्रा दिली जाणार आहे. जिल्ह्यात वीर्यमात्रा अवघ्या ८१ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

----------------------

प्रयाेगशाळेसाठी ४७ काेटी मंजूर

केंद्र शासनाने राष्ट्रीय गोकुळ मिशनांतर्गत राज्यात लिंग विनिश्चित वीर्यमात्रा उत्पादन करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी ४७.५० कोटी निधी मंजूर आहे. त्यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा २८ कोटी ५० लाख, तर राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा १९ कोटी रुपये आहे.

Web Title: Artificial insemination of 30,000 animals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.