मान्सूनपूर्व पाऊस सुरू होताच रत्नागिरी जिल्हा प्रशासन झाले अलर्ट, आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 03:06 PM2024-05-25T15:06:30+5:302024-05-25T15:07:08+5:30
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस सुरू होताच जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सजग झाला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील ...
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस सुरू होताच जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सजग झाला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर सर्व तहसील विभाग, नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये आता आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सुरू झाली आहेत. ४ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया संपताच याला अधिक गती येणार आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आपल्या कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारीसाठी दोन दिवसांपूर्वीच आढावा बैठक घेतली होती. यावेळी विविध विभागप्रमुख उपस्थित होते. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असल्याने जिल्हाधिकारी यांनी या अनुषंगाने विविध विभागप्रमुखांच्या विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. २०११ ते २०२३ या कालावधीत झालेला सरासरी पाऊस, आपत्तींचा पूर्वानुभव, पूर प्रवण, दरड प्रवण गावे, रासायनिक कारखाने, धोकादायक कारखाने आदींबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. विविध विभाग तसेच तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामग्री सुस्थितीत आहे का याची तपासून खात्री करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभाग, बंदर विभाग आदी महत्त्वाच्या विभागांना त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या अनुषंंगाने भूस्खलन, दरडग्रस्त, पूरप्रवण भागातील नागरिकांच्या दृष्टीने विशेष सतर्क राहून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य होण्याच्या दृष्टीने सर्व साहित्य आणि साधनांची सज्जता ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी सिंह यांनी या यंत्रणांना दिले आहेत. ४ जून रोजी मतमाेजणी प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच दक्ष राहणार आहे. जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने मदतकार्यासाठी आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.
- जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांची संख्या : २०६
- दरड कोसळण्याचा धोका असलेले घाट : ८
- दरड कोसळणारी घाटांची ठिकाणे : १३
जिल्ह्यात साहित्याची सज्जता
- पर्जन्यमापक यंत्रे : १३०
- सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली : ४०५
- पोर्टेबल तंबू : २०
- लाईफ जॅकेट : ८७०
- लाईफ बोट : १४६
- रोप अँड रेस्क्यू कीट : ५
- पोर्टेबल एलईडी लाईटनिंग सिस्टीम : ४२
- फायबर व रबर बोटी : १०