Ratnagiri: राजापुरात दुसऱ्या दिवशीही गाड्या तरंगत्याच, नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:45 AM2024-05-10T11:45:16+5:302024-05-10T11:45:56+5:30
राजापूर : शहरातील जवाहर चौकालगत असणाऱ्या खर्ली नदीपात्रात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही भरतीच्या पाण्यात अनेक वाहने अडकल्याची घटना घडली. बुधवारी ...
राजापूर : शहरातील जवाहर चौकालगत असणाऱ्या खर्ली नदीपात्रात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही भरतीच्या पाण्यात अनेक वाहने अडकल्याची घटना घडली. बुधवारी भरतीच्या पाण्यात गाड्या अडकल्यानंतर राजापूर महसूल प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे या ठिकाणी काेणतीच उपाययाेजना न केल्याने गुरुवारी पुन्हा अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
गतवर्षी राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पात्रातील गाळउपशाचे काम लोकसहभागातून करण्यात आले. त्यानंतर खर्ली नदीपात्रात सातत्याने भरतीचे पाणी येत आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यापासूनच खर्ली नदीपात्र पूर्णत: काेरडे झाले आहे. राजापूर शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यात खर्ली नदीपात्राचा वापर पार्किंगसाठी करत आहेत. तसेच खरेदीसाठी ग्रामीण भागातून येणारे ग्रामस्थही नदीपात्रातच आपली वाहने उभी करतात. त्यामुळे या भागात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययाेजना करणे गरजेचे हाेते.
गतवर्षी राजापूर नगर परिषदेने या ठिकाणी सूचनाफलक लावून नागरिकांना सावध केले हाेते. मात्र, या वर्षी तसा सूचनाफलक लावण्यात आलेला नाही. खर्ली नदीपात्रातील गाळामुळे भरतीचे पाणी या ठिकाणी येत नव्हते. मात्र, गतवर्षी गाळ उपसा केल्यानंतर हे पात्र रुंद झाल्याने अर्जुना व काेदवली नदीतील भरतीचे पाणी या ठिकाणी येत आहे. बुधवारी खर्ली नदीपात्रात भरतीच्या पाण्यात अनेक वाहने बुडून त्यांचे नुकसान झाले. गुरुवारीही पुन्हा भरतीचे पाणी या ठिकाणी आल्याने वाहने पाण्यात तरंगत हाेती.