Ratnagiri News: सर्वच खलाशी गावाला पळाले, नौकामालकांचे व्यवहार बुडाले; नौका बंदरातच उभ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:31 PM2023-02-06T14:31:10+5:302023-02-06T15:30:44+5:30
तरीही अनेक खलाशी निम्मा हंगाम संपला तरी परतलेले नाहीत.
रत्नागिरी : निम्मा मासेमारीचा हंगाम संपला तरी आजही अनेक नौकांवर खलाशी नसल्याने त्या नौका बंदरांमध्ये नांगरावर उभ्या आहेत. आगाऊ रक्कम घेऊनही परराज्यातील खलाशी परतलेले नाहीत, तर काही नौकांवरील खलाशांनी पलायन केल्याने त्या नौकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे नौका मालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
डिसेंबरनंतर पर्ससीन नेटने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याने किनारपट्टीवरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम मासेमारीशी संबंधित अन्य व्यवसायांवर झाला आहे. ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या तसेच पारंपरिक मच्छीमारांचीही आर्थिक स्थितीही सध्या बिकट आहे.
नौकांवर काम करण्यासाठी स्थानिक खलाशी मिळत नाहीत. त्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू तसेच नेपाळ येथील खलाशी रत्नागिरीतील नौकांवर काम करतात. त्यांना आगावू रक्कम दिल्याखेरीज ते येत नाहीत. त्यातील अनेक खलाशांनी पलायनही केले आहे. त्यांना दिलेली आगाऊ रक्कमही नौकामालकांना त्यांच्याकडून वसूल करता आली नसल्याने नौकामालक अधिकच संकटात सापडले आहेत.
काही खलाशांनी मासेमारी सुरू झाल्यानंतर येणार असल्याचा शब्द मालकांना दिला होता. मात्र, मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली तरीही अनेक खलाशी निम्मा हंगाम संपला तरी परतलेले नाहीत. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त नौका अजून बंदरातच उभ्या आहेत. लाखो रुपये आगाऊ घेऊनही खलाशांनी फसविल्याने नौकामालक हैराण झाले आहेत.