‘आशां’च्या प्रश्नांसाठी आरोग्यमंत्र्यांशीही भांडू
By admin | Published: March 16, 2016 10:33 PM2016-03-16T22:33:20+5:302016-03-16T23:55:04+5:30
तुकाराम गोलमडे : आनंदीबाई जोशी पुरस्काराचे रत्नागिरी वितरण
रत्नागिरी : वेळ आल्यास आशांसाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशीही भांडू, असा इशारा शासनाला देत देशात महागाई आहे, तर आशातार्इंना महागाई नाही का? याचा विचार शासनाने करावा, असे उद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी व उत्कृष्ट आशा पुरस्कार वितरणाच्या वेळी काढले.
देशातील पहिल्या डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार योजना जाहीर करण्यात आलेली होती. चिपळूण तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावून २५००० रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले. मंडणगड तालुक्यातील कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राने द्वितीय क्रमांकाचे १५००० रुपयांचे, तर लांजा तालुक्यातील भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राने तृतीय क्रमांकाचे १०००० रुपयांचे रोख बक्षीस पटकावले.
उत्कृष्ट उपकेंद्रांमध्ये प्रथम क्रमांक - मंडणगड तालुक्यातील आंबडवे उपकेंद्राला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक - चिपळूण तालुक्यातील कळंबट उपकेंद्राला १०००० रुपये, तृतीय क्रमांक - लांजा तालुक्यातील मठ उपकेंद्राला ५००० रुपये, तर ग्रामीण रुग्णालयाचा मान दापोली उपजिल्हा रुग्णालय ५०,००० रुपये बक्षीसपास पात्र ठरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ८० आशा कार्यकर्त्या यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद पुसावळे, जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती देवयानी झापडेकर, समाजकल्याण समिती सभापती शीतल जाधव, सदस्य उदय बने, विजय सालीम, अजय बिरवटकर, लांजा पंचायत समिती सभापती लीला घडशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब आरसुळकर, जिल्हा परिषद सदस्या विनया गावडे, अस्मिता केंद्रे, सुजाता तांबे, प्रणिता देवरुखकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, जिल्हा माध्यम अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आनंदा चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आरोग्य विभागाच्या कार्याबाबत तसेच आशा कार्यकर्ती यांच्या कामाबाबत गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन कदम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिजीत कांबळे व बेबीनंदा खामकर यांनी मेहनत केली. (शहर वार्ताहर)