जिल्हा परिषदेसमोर आशासेविकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:10+5:302021-06-24T04:22:10+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील आशासेविका व गटप्रवर्तकांसमवेत रत्नागिरी जिल्हा ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील आशासेविका व गटप्रवर्तकांसमवेत रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर बुधवारी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आशा स्वयंसेविकांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या.
मार्च २०२० पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व विलगीकरण केंद्र येथे सकाळपासून ८ तासांची ड्यूटी लावण्यात आली आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व गृहभेटींमध्ये आशा स्वयंसेविकांना कोरोना संशयित व्यक्तीची पल्स रेट, थर्मल गनने तपासणी करावी लागते. या कामाकरिता त्यांना केंद्र सरकारने दरमहा १००० रुपये विशेष भत्ता म्हणजेच त्यांना ३५ रुपये प्रतिदिन भत्ता देण्यात येतो.
महाराष्ट्र सरकार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना प्रतिदिन ८ तास कोरोना संबंधित कामाकरिता काही मानधन देत नाही. त्यांना वेठबिगारासारखी वागणूक देते. त्याविरोधात आणि विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यामध्ये शेकडो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक सहभागी झाले होते.