आशा सेविकांचे रत्नागिरीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 01:34 PM2021-02-18T13:34:31+5:302021-02-18T13:36:00+5:30
Government Ratnagiri AshaWorker- कोरोना काळातील कामासाठीचे मानधन, वेतनवाढ, सन्मानाच्या वागणुकीसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांनी रत्नागिरीत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.
रत्नागिरी : कोरोना काळातील कामासाठीचे मानधन, वेतनवाढ, सन्मानाच्या वागणुकीसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांनी रत्नागिरीत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.
गेल्या ११ महिन्यांपासून कोरोना महामारीमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक महिलांना कोरोना महामारीमध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली रक्कम सर्व आशांना अजूनही मिळालेली नाही.
ग्रामविकास खात्यामार्फत आशा व गटप्रवर्तक महिलांना १ हजार रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. १ नोव्हेंबर २०२० पासून मागील ४ महिन्यांचे वाढीव मानधन अजूनही आशांना व गटप्रवर्तक महिलांना मिळालेले नाही.
कोरोना महामारीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका वंदना गुरनाणी यांनी आशांच्या नियमित चार कामांसाठी दरमहा २ हजार रुपये कोणतीही कपात न करता देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. परंतु या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केलेली नाही.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठीचा प्रतिदिन १५० रुपये भत्ता अद्याप सर्व आशांना मिळालेला नाही. तसेच क्षयरोग व कुष्ठरोग शोधमोहिमेमध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांनी काम करूनही, त्याचाही मोबदला मिळालेला नाही.
आशा व गटप्रवर्तक महिला मागील १५ वर्षांपासून दररोज नियमित काम करीत आहेत. तरीही सरकारने रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वत:च लागू केलेले किमान वेतनसुध्दा आशा व गटप्रवर्तक महिलांना दिलेले नाही.
यासह अन्य अनेक मागण्यांसाठी आशा सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी विद्या भालेकर, अंकिता शिंदे, संजीवनी तिवरेकर, पल्लवी पालकर, भाग्यश्री हळदे, पूर्वी जाधव, वृषाली साळवी, समिना काझी, दर्शना साळवी, अपर्णा जाधव, सोनाली मांगले, प्राजक्ता देवरुखकर, वर्षा भातडे यांच्यासह अनेक आशा सेविका उपस्थित होत्या.
वाढीव मानधन कापले
घोषित केलेल्या वाढीव मानधनातून २०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत दरमहा कपात करण्यात आलेली आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक असून, कपात केलेली सर्व रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे.