आशा सेविकांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार : शिल्पा मराठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:59+5:302021-06-19T04:21:59+5:30
रत्नागिरी : आशा सेविकांच्या महाविकास आघाडीने अन्याय केला आहे. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा आपण नक्की करू, असे प्रतिपादन भाजपा महिला ...
रत्नागिरी : आशा सेविकांच्या महाविकास आघाडीने अन्याय केला आहे. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा आपण नक्की करू, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिल्पा धनंजय मराठे यांनी केले.
आशा सेविकांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, यासंदर्भात ७ जुलै रोजी होणाऱ्या अधिवेशनामध्ये आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण, तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर यांच्यातर्फे शासनाचे लक्ष वेधणार आहोत, असे मराठे यांनी स्पष्ट केले.
मराठे म्हणाल्या की, मुख्यमंत्री यांनी आशा सेविकांचे कोरोनाच्या काळातील कामकाज हे फार उत्तम आहे, असे उद्गार काढले. परंतु आशा सेविकांनी प्रामुख्याने केलेल्या मानधन वाढ व आरोग्य विमा कवच या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना दिलासा मिळण्याऐवजी दुःख व यातनाच सहन कराव्या लागत आहेत.
प्रत्येकवेळी मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री आशा सेविकांच्या मागण्यांच्या घोषणा करतात. पण प्रत्यक्षात त्यांना आशेवर ठेवले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. स्वतःच्या परिवाराची चिंता न करता आरोग्य सेवा देणे हेच उद्दिष्ट समोर ठेवून या सेविका गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात काम करत आहेत. त्यामुळेच त्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास शिल्पा मराठे यांनी बोलून दाखवला.