स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली
By शोभना कांबळे | Published: August 9, 2022 04:43 PM2022-08-09T16:43:41+5:302022-08-09T16:44:08+5:30
चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत.
चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत.
स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठ्यांबरोबरच अगदी किशोरवयीन मुलांनीही लढा दिला. १९४२ साली सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीने विद्यार्थ्यांमध्येसुद्धा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. या चळवळीत रत्नागिरीतील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्वातंत्र्यासाठी विद्यार्थिदशेतील अनेक मुलांनी कारावास भाेगला. यात रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांचा समावेश होता. विद्यार्थिदशेतच त्यांनी या आंदोलनात सक्रिय उडी घेतली होती. आशाताईंचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. अगदी ९६च्या पुढील त्यांचे वय असूनही १९४२ च्या लढ्याच्या आठवणी जशाच्या तशा सांगताना त्या हरखून जात.
आशाताई पाथरे त्यावेळी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये बी. ए. करत होत्या. ९ ऑगस्ट १९४२ला मुंबईला गवालिया टँकवर म्हणजे आताच्या आझाद हिंद मैदानावर महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारने सर्व प्रमुख नेत्यांना गजाआड केले. त्यावेळी विद्यार्थिदशेतही देशभक्ती ओतप्रोत भरलेली असे. आशाताईंनी जाग्या केलेल्या त्यांच्या आठवणींपैकी ही एक आठवण. एके दिवशी देशप्रेमाने भारावलेले त्यांचे वर्गमित्र ‘मधू पोंक्षे’ त्यावेळच्या सांगली स्टेशनसमोरील चौकात उभे राहून ब्रिटिशांविरुद्ध भाषण करू लागले. त्यांचे सर्व मित्र-मैत्रिणी त्यांच्यासोबत होते. त्यात आशाताईंचाही समावेश होता.
जमाव गोळा झालेला पाहताच ब्रिटिश सरकारचे शस्त्रास्त्रधारी घोडेस्वार या विद्यार्थ्यांवर चालून आले. मात्र, मधू पोंक्षे जराही न डगमगता आपले भाषण करत होते. ब्रिटिश पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी प्रखर लाठीहल्ला सुरू केला. मधू पोंक्षेंना मारू नये म्हणून या विद्यार्थ्यांनी त्यांच्याभोवती कडे केले होते. पण हे कडे तोडून त्याला बाहेर ओढून पोलीस अमानुषपणे दांडक्याने मारू लागले. मधू पोंक्षे पळतच स्टेशनकडे जात असताना एका दांडक्याचा फटका त्यांच्या डोक्यावर बसला. डोके फुटल्याने त्यातून रक्ताचा पाट वाहू लागला. ते स्टेशनच्या पायरीवरच बेशुद्ध पडले.
येरवडा येथील कारागृहातही आशाताईंनी सक्तमजुरीचीही शिक्षा भोगली होती. त्यांच्या बरॅकमध्ये यावेळी सातारा येथील सुलोचना जोशी, कुसुम मोकाशी या त्यांच्या मैत्रिणीही होत्या. त्यांच्यासमवेत असणाऱ्या गुन्हेगार महिलांसोबत राहाण्याचे अनुभव आशाताई सांगताना अंगावर शहारे येत. नऊ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सुलोचना जोशी या त्यांच्या मैत्रिणीला ब्रिटिश सरकारने बर्फाच्या लादीवर झोपण्याची शिक्षा दिली.
मात्र, देशप्रेमासाठी तिने तीही आनंदाने सोसली. आशाताईंचे पतीही आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत आपला खारीचा वाटा उचलायला मिळाला, हे आपले भाग्य असल्याचे त्या अभिमानाने सांगत. २७ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी त्या कालवश झाल्या आणि रत्नागिरीला स्वातंत्र्य चळवळीशी जोडणारा दुवा निखळला.