अॅम्बुलन्स असोसिएशनतर्फे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:18+5:302021-07-27T04:33:18+5:30
प्रस्ताव प्रलंबित रत्नागिरी : मिरजोळे येथील नदीकिनारी जमिनी खचण्याचा प्रकार सातत्याने सुरु आहे. काही भागात भेगा पडल्या असून, तो ...
प्रस्ताव प्रलंबित
रत्नागिरी : मिरजोळे येथील नदीकिनारी जमिनी खचण्याचा प्रकार सातत्याने सुरु आहे. काही भागात भेगा पडल्या असून, तो भाग खचण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंतीचा प्रस्ताव केला असून, अजूनही त्याला निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे भविष्यात धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संपर्क तुटला
खेड : तालुक्यातील शिरगाव येथे झालेल्या ढगफुटीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात येणारा रस्ता ७ ते ८ ठिकाणी खचल्याने मुख्य मार्गावरील पूल वाहून गेला असल्याने खोपी गावाशी व इतर लगतच्या वाडीतील असलेला संपर्क तुटला आहे. परिसरातील घरांनाही धोका निर्माण झाला आहे.
केंद्राचा गौरव
लांजा : साटवली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, डॉ. आदिती तावडे यांच्यासह शिपाई, चालक, आशा सेविका तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार देण्यात आला.
अर्थसहाय्याची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे झालेल्या भूस्खलनामुळे एका घराचे नुकसान झाले आहे. त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रशासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी सागर मोहिते यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या भागात २० गुंठे जमीन खचली आहे. त्यामुळे या भागातील घरांना धाेका निर्माण झाला आहे.
युवा सेना मजबूत करा
चिपळूण : शिवसेनेमध्ये जुना-नवा वाद असता कामा नये. शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांवर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी युवा सेनेची फळी मजबूत करण्याचे आवाहन तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी केले आहे. ढोक्रवली येथे झालेल्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन करुन संघटनात्मक व विकासात्मक कामाचा आढावा घेतला.
शिक्षक संघाची मदत
चिपळूण : चिपळूण व खेडमध्ये झालेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे २०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. रमाकांत शिगवण यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसाठी निधी संकलित करण्यात आला.
पुस्तिका भेट
मंडणगड : तालुक्यातील तिढे निमदेवाडी येथील रहिवासी अर्जुन बैकर, छाया बैकर, दिगंबर बैकर यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका व वह्यांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक आनंद सुतार यांच्याकडे हे साहित्य वितरीत करण्यात आले.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
दापोली : शिवतेज आरोग्य सेवा संस्थेतर्फे पालगड विभागासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम व आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी समाजकल्याण समिती सभापती भगवान घाडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, तालुका संघटक उन्मेश राजे उपस्थित होते.