बेलदार संघटनेतर्फे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:28+5:302021-08-13T04:35:28+5:30
मंडणगड : महाराष्ट्र राज्य बेलदार संघटनेतर्फे काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुरात बाधित झालेला महाड, चिपळूण आणि खेड या भागातील ...
मंडणगड : महाराष्ट्र राज्य बेलदार संघटनेतर्फे काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुरात बाधित झालेला महाड, चिपळूण आणि खेड या भागातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेड शहर व चिपळूण शहरातील पेठमाप, खेर्डी, पिंपळी परिसरातील कुटुंबीयांना पाणी व अन्नाचे वाटप केले.
वाचन परीक्षण स्पर्धा
राजापूर : तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिर बालकाश्रमामध्ये साने गुरुजींच्या ‘शामची आई’ या पुस्तकावर आधारित पुस्तक वाचन परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातून शालेय स्तरावर अनुक्रमे पहिले तीन क्रमांक काढून प्रशस्तीपत्रक व पुस्तक भेट देऊन विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे.
शयनयान सेवा सुरु
सावर्डे : चिपळूण आगाराची शयनयान सेवा महापुरामुळे बंद ठेवण्यात आली होती. २० दिवस बंद असलेली शयनयान सेवा बुधवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. पुणे मार्गावर धावत असलेल्या दोन बसेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.
ग्रंथालयाचे उद्घाटन
मंडणगड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकारातून मंडणगड नगर पंचायत कार्यालयात सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या हस्ते सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, संस्थेचे संचालक आदेश मर्चंडे आदी उपस्थित होते.
२३ लाखांचे वाटप
रत्नागिरी : खेड, चिपळूण येथे झालेल्या अतिवृष्टीतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाखाची आर्थिक मदत देण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत २३ लाखांचे वाटप पूर्ण झाले आहे. तसेच ६४ बाधित गावांमधील २,५०७ कुटुंबांना १२ हजार ८०० लीटर केरोसिनचे वाटप करण्यात आले आहे.