Ratnagiri News: चिमुकल्यांमध्ये रमली अंतराळवीर; नासा, तिच्या कार्यपद्धतीविषयी मुलांना दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:49 PM2023-02-07T15:49:16+5:302023-02-07T15:49:38+5:30
नासाची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आणि सातासमुद्रापार अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा योग आला. अंतराळवीर होण्याचे स्वप्न साकारले.
चिपळूण : नासाद्वारे अमेरिकेत अंतराळवीर बेसिक ॲडव्हान्स ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी निवड झालेल्या अंतराळवीर आरती पाटील यांनी रविवारी तालुक्यातील मुंढे येथील प्राथमिक शाळेला भेट दिली. या भेटीत शाळेतील चिमुकल्यांशी संवाद साधताना बराच वेळ त्या मुलांमध्येच रमल्या होत्या. यावेळी त्यांनी नासा व तिच्या कार्यपद्धतीविषयी मुलांना माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांशी हितगूज करताना अंतराळवीर आरती पाटील म्हणाल्या की, आपल्याला लहान वयातच विविध आव्हाने पेलण्याची जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण झाली होती. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच इंटरनेटवर वेगवेगळ्या संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी नवनवीन बाबी शिकण्याची भूक वाढतच होती. नवनवी आव्हाने समोर येत होती. आर्थिक स्थिती नाजूक असतानाही इच्छाशक्ती स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच नासाची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आणि सातासमुद्रापार अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा योग आला. अंतराळवीर होण्याचे स्वप्न साकारले.
मी शिक्षिका व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच बी. एड. करून शिक्षिका झाले. इतकेच नव्हे तर साधू-वासवानी आंतरराष्ट्रीय स्कूलची मुख्याध्यापिका म्हणूनही काम केले. लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या घेण्याची सवय शिक्षक म्हणून ठरावीक चौकटीत काम न करता चौकटीबाहेर जाऊन मुलांना शिकवावे, असे वाटायचे. या संपूर्ण वाटचालीत अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. परंतु, अजूनही आपल्याला मोठी झेप घ्यायची असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जनार्दन खेतले, मुंढे तर्फे चिपळूणचे सरपंच मयूर खेतले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राज खेतले, मोहन पाटील, ज्ञानेश्वर नाझरे, विद्याधर जोशी, विजय मोहिते, तळसर सरपंच सिद्धी पिटले, मुंढे उपसरपंच प्रतिभा कांबळी, पोलिसपाटील विभा मोहिते, श्रीपत खेतले, गणेश खेतले, मोहन गायकवाड, बबन खेतले, प्रमिला महाडिक, सुनील शिंदे उपस्थित होते.
आगळेवेगळे प्रयोग
सर्व शिक्षण संचालकांच्या अनुमतीने एक आगळावेगळा प्रयोग सुरू केला. शैक्षणिक वातावरण खूप चांगले असल्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची संधी मिळाली. जगभरातल्या पंधरापेक्षा अधिक देशांच्या शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास केला, असे त्या म्हणाल्या.