रत्नागिरीत एटीएमची तोडफोड
By admin | Published: December 16, 2014 10:40 PM2014-12-16T22:40:26+5:302014-12-16T23:46:36+5:30
तीन लाखांची हानी : अज्ञाताच्या कृत्याने खळबळ
रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या मिरकरवाडा भागातील बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम कक्षाची अज्ञाताकडून तोडफोड झाल्याचे आज (मंगळवार) सकाळी ९ वाजता उघड झाले. यामुळे तीन लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद या सेंटरची देखभाल करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट अॅण्ड सर्व्हिस प्रा. लि.चे कर्मचारी अंशुल विलास पिलणकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी रात्री ११ नंतर ते १६ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी ९ या वेळेत हा प्रकार घडला आहे.
मिरकरवाडा येथे बॅँक आॅफ इंडियाचा एटीएम कक्ष तेथील रहीम करीम अकबर अली यांच्या घराच्या शेडमध्ये उभारण्यात आला आहे. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास या कक्षात तोडफोड झाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना तसेच या सेंटरची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी एटीएम सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराचे हॅँडल तोडलेले दिसून आले.
तसेच आतील छत, लाईट फिटिंग, एटीएम मशिनच्या युपीएस व बॅटरीचे नुकसान केले आहे. चोरट्याला एटीएम मशीन फोडण्यात यश आले नाही.
याबाबत पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही दिवसात एटीएममधून चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
एटीएम सुरक्षा गंभीर विषय...
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील एटीएम सेंटर्स किती सुरक्षित आहेत, तेथे सुरक्षारक्षक असतो काय, असेल तर संशयास्पद व्यक्तीकडे त्याचे किती लक्ष असते, याबाबत वर्षभरापूर्वीच ‘लोकमत’च्या टीमने मध्यरात्री स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यावेळी धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षक होते. परंतु त्यातील काहीजण झोपा काढत होते, तर काही सेंटर्सवर सुरक्षारक्षकच नव्हते. त्यामुळे एटीएम सेंटर्सची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचे उघड झाले होते. अजूनही या सेंटर्सची सुरक्षा राम भरोसे असल्याची स्थिती आहे. गेल्याच पंधरवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील माणगाव येथेही एटीएम कक्षातील एटीएम मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. त्यामुळे या सेंटर्सची सुरक्षा हा भविष्यातील गंभीर विषय बनू पाहात आहे.
फूटेजकडे लक्ष
या एटीएम कक्षात सी. सी. टी. व्ही. कॅमेरा बसवण्यात आला आहे. मात्र, त्यासंबंधी देखभाल करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी रत्नागिरीत आल्यावर रेकॉर्डिंगची तपासणी होईल व त्यात कृत्य कोणी केले हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सी. सी. टी. व्ही. फूटेजकडे लक्ष लागले आहे.