चिपळुणात भर बाजारपेठेत परिचारिकेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 06:29 PM2021-06-18T18:29:45+5:302021-06-18T18:31:14+5:30
Crimenews Chiplun Ratnagiri : चिपळूण शहरातील भर बाजारपेठेतील भोगळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अवघे चिपळूण सुन्न झाला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी संबंधित नराधमाचा शोध सुरू केला आहे.
चिपळूण : शहरातील भर बाजारपेठेतील भोगळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अवघे चिपळूण सुन्न झाला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी संबंधित नराधमाचा शोध सुरू केला आहे.
शहरातील भोगाळे येथे एस.टी. महामंडळाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. या जागेत अतिक्रमण हटाव मोहिमेत हटविण्यात आलेले खोके व हातगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. हा भाग चारही बाजूंनी हातगाड्या व खोक्यांनी वेढलेला असल्याने संबंधित नराधमाने त्याचा फायदा उठवला.
संबंधित तरुणी बाजारपेठेतील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असून, ती रात्रपाळीसाठी मध्यवर्ती बसस्थानकात उतरली. त्यानंतर भोगाळे येथून चिंचनाक्याच्या दिशेने चालत जात असताना मागून येऊन संबंधित नराधमाने तिला ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
सध्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी ४ वाजता बंद होतात. त्यातच भोगळे परिसरात कायम अंधार असतो. त्यातच गुरुवारी येथे मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे हा रस्ता पूर्णतः निर्मनुष्य होता. त्याचा फायदा उठवत नराधमाने अत्याचार केला. यावेळी झालेल्या झटापटीत संबंधित तरुणीला दुखापत झाली आहे. तिची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी रात्रीच याविषयी तपास सुरू केला आहे. त्यासाठी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत.