आमदार उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोरच झळकले निषेधाचे बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 12:51 PM2022-08-03T12:51:47+5:302022-08-03T12:52:52+5:30
शहरातील साळवीस्टॉप येथील शिवसेना शाखेसमोरच भला मोठा बॅनर लावण्यात आला
अरुण आडीवरेकर
रत्नागिरी : बंडखोर शिंदे गटात सामील झालेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे जमावाने काल, मंगळवारी हल्ला केला. सामंत यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची बातमी रत्नागिरीत धडकताच शहरात त्यांचे पडसाद उमटू लागले आहेत. रत्नागिरी शहरात सर्वत्र हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर झळकवण्यात आले असून, शिवसेना शाखेसमोरच बॅनर लावण्यात आला आहे.
आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजतात सामंत समर्थक एकवटले असून, या घटनेचा निषेध करण्यात केला आहे. त्यानंतर काल रात्रीच शहरातील विविध भागात निषेधाचे फलक आमदार समर्थकांनी लावले आहेत.
विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते
१० ते १५ फुटाच्या या बॅनरवर आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध, विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते. असे हल्ले करणारे भ्याडच ! अशा प्रकारे निषेध व्यक्त करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील साळवीस्टॉप येथील शिवसेना शाखेसमोरच भला मोठा बॅनर लावण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत.