रत्नागिरीत महिलांचा पालिकेवर हल्लाबोल
By Admin | Published: December 29, 2014 10:20 PM2014-12-29T22:20:58+5:302014-12-29T23:37:22+5:30
स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ... हे काम येत्या आठ दिवसांनंतर सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सध्या बोजवारा उडाला आहे. शहरातील काही भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज सोमवारी रत्नागिरी पालिकेवर हल्लाबोल केला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पाणी सभापतीपदी आलेल्या स्मितल पावसकर यांना संतप्त महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तारेवरची कसरत करावी लागली. गेल्या चार दिवसांपासून शहरातील झाडगाव भागात नळाला पाणीच आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मध्येच पाणीपुरवठा ठप्प होण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांची पाण्याची समस्या कधी सुटणार, असा सवाल येथील महिलांनी पाणी सभापती पावसकर यांना केला. झाडगावप्रमाणेच शहरातील खालची आळी येथील महिलांनीही पालिकेवर पाणीप्रश्नी धडक दिली. या दोन भागांचाच नव्हे; तर शहरातील अनेक भागांमधील ही वारंवार उद्भवणारी पाणीसमस्या असून, पालिकेच्या पाणी विभागाकडून मात्र तात्पुरती मलमपट्टी केली जाते व पुन्हा पाणीपुरवठा सुरू होतो. जागोजागी जलवाहिन्या गंजलेल्या असून फुटलेल्या आहेत. गटारातून आलेल्या जलवाहिन्याही फुटलेल्या असून, त्यातून सांडपाणीही अनेकदा नळातून येण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलावर्ग संतप्त झाला आहे. (प्रतिनिधी)
शहर बाजारपेठ व खालची आळीसह अनेक ठिकाणी असलेला हा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी या भागाला साळवी स्टॉप येथून स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. जलवाहिनीचे हे काम येत्या आठ दिवसांनंतर सुरू केले जाईल, असे आश्वासन पाणी सभापती स्मितल पावसकर यांनी दिले. यावेळी सेनेचे नगरसेवक राहुल पंडित, शहर विकास आघाडीचे नगरसेवक दत्तात्रय तथा बाळू साळवी उपस्थित होते.