महिलांना सहहिस्सेदार करण्यासाठी प्रयत्न
By admin | Published: August 3, 2016 12:52 AM2016-08-03T00:52:38+5:302016-08-03T00:52:38+5:30
प्रदीप पी. : महसूल आठवड्यात महिला सबलीकरणावर भर देण्यासह विविध उपक्रम
रत्नागिरी : १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत महसूल आठवडा साजरा केला जाणार असून, या कालावधीत महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या माध्यमातून महिलांना लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत जमिनीची, घराची मालकी मिळवण्यासाठी विशेष स्तरावर प्रयत्न होणार आहेत. त्याचबरोबर महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून माहिती दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकण आयुक्तांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनतर्फे १ आॅगस्ट रोजी प्रत्येक तालुक्यात महसूल दिन साजरा करण्यात आला. तसेच १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत महसूल दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. याची सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी वनमती उपस्थित होत्या.
महसूल आठवडा कालावधीत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. विशेषकरून ग्रामस्तरावर महिलांच्या विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. यात महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रधानमंत्री जनधन योजना, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा कर्ज योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सावित्रीबाई फुले योजना, दारिद्र्यरेषेखालील महिलांना, दहावी ते बारावीतील मुलींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, नरेगाअंतर्गत जॉबकार्ड वाटप, तसेच परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देणे आदींसाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी यावेळी सांगितले.
ग्रामसभांमध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाची माहिती महिलांना देण्यात येणार आहे. तसेच ग्रामसभेत पोलीस विभागाच्या ‘प्रतिसाद’ या अॅपबद्दल माहिती देण्यात येणार आहे. पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत तालुका पातळीवर महिला लोकप्रतिनिधींचे मेळावे घेतले जाणार आहेत.
महिलांच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठीही जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विविध शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याविषयी महिलांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. मनोधैर्य योजनेंतर्गत २० प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, या आठवड्यात हा निधी प्राप्त होईल, अशी माहितीही यावेळी प्रदीप पी. यांनी दिली. (प्रतिनिधी)
निर्णय : टोल फ्री क्रमांकावरुन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क
४अपंग व्यक्तींची गावस्तरावर तपासणी करून प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही.
४१८ वर्षांवरील नवमतदार महिलांची मतदार म्हणून नोंदणी.
४प्रत्येक तालुक्यात मंडलस्तरावर /आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य मेळावे घेणे,
४उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ महिलांना मिळवून देणे.
अधिकारी थेट दूरध्वनीवर ..!
जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना दर सोमवारी विभागप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधता येणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व जिल्हा स्तरावरील अधिकारी, विभागप्रमुख दर सोमवारी आपल्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याशी संपर्काकरिता ०२३५२-२२२३०१ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावरून तर मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी ०२३५२-२२२३८६ या क्रमांकावर संपर्क करता येईल.
महिलांचे नावही सातबारावर!
महसूल आठवड्यात महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. आतापर्यंत जमीन किंवा घर यावर केवळ पतीचा किंवा नात्यातील पुरूषाचा हक्क असे. स्त्रीला त्यात कोणताही अधिकार मिळत नाही. घर किंवा जमीन हक्काची मक्तेदारी मोडीत काढून महिलांना यात सहहिस्सेदार होण्याचा हक्क मिळावा, यासाठी लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे आता महिलांचे नावही सातबारा दाखल्यांवर लागण्यास मदत होणार आहे.