सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न
By Admin | Published: September 28, 2016 12:00 AM2016-09-28T00:00:15+5:302016-09-28T00:26:31+5:30
संगमेश्वर तालुका : कार्यकर्त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू, पक्षांतराची पसरली साथ
सचिन मोहिते --देवरुख --जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची चाहुल सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन मजबुतीकरिता राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. याच काळात कार्यकर्त्यांची तळ्यात-मळ्यात उड्या मारायला सुरुवात होते. याची प्रचिती गेल्या महिन्यात संगमेश्वरवासीयांना आली. संगमेश्वर तालुका शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. मात्र, त्याला आता भाजपकडून सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गेल्या निवडणुकात तसेच अन्य निवडणुकांत सेना आणि भाजप अशी युतीत असलेले दोन्ही पक्ष आता आपली वेगळी ताकद निर्माण करायला निघाले आहेत आणि म्हणूनच स्वतंत्र लढण्याची उर्मी हे पक्ष बाळगत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच देवरुखच्या नगरपंचायत निवडणुकीतदेखील युती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मात्र, नगरपंचायतीमध्ये अडीच वर्षाच्या कालावधीनंतर देवरुखात भाजपने राष्ट्रवादीला जवळ करुन सेनेला सत्तेपासून वंचित ठेवल्याचे दिसून आले. म्हणजेच भाजप आता सेनेपासून दूर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
तालुक्यात गत काही महिन्यात राजकीय घडामोडी पाहता कार्यकर्त्यांची तळ्यात - मळ्यात होणारी स्थिती दिसून आली आहे. सूर्यकांत साळुंखे यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेतून निवडणूक लढविली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा जिल्हा परिषद गटाला त्यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. कसबा जिल्हा परिषद गट आणि पंचक्रोशीतील काही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश करुन घेण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्याचा परिणाम ऐन निवडणुकीत कसा होतो, हे येत्या ४ महिन्यात दिसून येणार आहे.
सध्या भाजपने पक्षवाढीसाठी विशेषत्वाने कार्यक्रम राबविल्याचे दिसून येत आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी गणेशोत्सवापूर्वी संगमेश्वर तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय कार्यकर्त्यांच्या कॉर्नर सभा, कार्यकर्ता मेळावा घेऊन विशेष प्रयत्न केले. तसेच युवकांवर जबाबदाऱ्या देत त्यांना महत्त्वाची पदे देऊन युवकांचा मोठा सहभाग वाढवित आहेत.
तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांचा मागोवा घेतल्यास असे स्पष्ट झाले आहे की, शिवसेनेतून मातब्बर नेते अन्य पक्षात गेले. मात्र, तालुक्यात सेनेवर तसा काहीच परिणाम होत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे सध्या नव्याने भाजपमध्ये प्रवेशलेले सूर्यकांत साळुंखे यांचा प्रभाव आगामी निवडणुकात कसा पडतो, ते स्पष्ट होईल.
काही कार्यकर्ते सेनेतून भाजपमध्ये गेले असले तरी सेनेवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे.
समाजहितासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. आंदोलन असो वा मोर्चे, यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे निवडणुकीत निवडून येण्याइतपत ताकद मनसेमध्ये नसली तरी समोरच्या उमेदवारांच्या मतांचे विभाजन करुन त्याला पराभूत करण्यास हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.