हिंदूंमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:32 PM2024-10-17T13:32:21+5:302024-10-17T13:32:45+5:30
रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी ...
रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या घटना घडल्या त्यात मी कोणाला पाठीशी घातले आहे का, कोणावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांना फोन केला आहे का, हे तपासा. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी असे काही पुरावे दिले, तर मी राजकारण सोडेन. अन्यथा अशा लोकांनी बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे, असा सणसणीत इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गायीचा अवयव सापडला, आंदोलन झाली. एका मुलीबाबत काही गैरप्रकार घडला, वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाप्रसंगी गोंधळ झाला. कोणत्याही वाईट किंचा चुकीच्या कृत्याचे समर्थन मी कधीही करणार नाही. या चार घटनांमध्ये काही ठराविक लाेक मलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू समाजामध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.
एमआयडीसीमध्ये जो काही प्रकार घडला त्याबाबत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. महिलेबाबतच्या प्रकरणात खरेतर पोलिसांचा अहवाल आतापर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. आठ -दहा दिवसांत तोही स्पष्ट होईल. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाबाबतही मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे कार्यालय २५ मे २०२३ रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. ते मी मंजूर केलेले नाही, असेही सामंत यांनी सांगितले.
..तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का?
संघाच्या पथसंचलन प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, त्यात शुभम साळवी याच्यासह सात ते आठ माझेच सहकारी आहेत. माजी नगरसेवक मुसा काझी हेही माझ्या पक्षाचे आहेत. जर मी यात हस्तक्षेप केला असता, तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का, असा प्रश्न सामंत यांनी केला. लाठीहल्ल्याचा आदेश कोणाचा होता, याची चौकशी करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. त्याला मी पूर्ण सहमत आहे. खरोखरच हे शोधून काढा, असे सामंत यांनी सांगितले.