Ratnagiri: पाणी उशिरा दिल्याच्या रागातून कार थेट हॉटेलमध्येच नेण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:02 PM2024-06-24T12:02:05+5:302024-06-24T12:02:15+5:30
कारचालकाची जमावाकडून धुलाई
चिपळूण (जि. रत्नागिरी) : पाणी उशिरा दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ग्राहकाने चक्क हॉटेलमध्येच कार नेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण शहरातील काविळतळी येथे शनिवारी रात्री घडला. हाॅटेलसमोर दुचाकी असल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. मात्र, यामध्ये सुरक्षारक्षक जखमी झाला असून, चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आशीर्वाद विजय आयरे (४८, रा. खेर्डी, मूळ गाव खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काविळतळी परिसरात प्रवीण शिंदे यांचे ओमीज किचन नावाचे हॉटेल आहे. गर्दीमुळे अनेकजण हॉटेलच्या बाहेर प्रतीक्षेत होते. अशा परिस्थितीत आशीर्वाद आयरे हे हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, ग्राहकांची गर्दी असल्याने पाणी देण्यास उशीर झाला. त्यामुळे आयरे यांनी हॉटेलमालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर रागाच्या भरात आयरे तेथून निघून गेले. रस्त्यावर उभी केलेली आपली कार त्यांनी भरधाव वेगाने थेट हॉटेलमध्ये घुसविण्याचा व येथील लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली. हॉटेलच्या बाहेर काही दुचाकी उभ्या असल्याने कार थेट हाॅटेलमध्ये गेली नाही. मात्र, या घटनेत हॉटेलच्या बाहेर उभा असलेले सुरक्षारक्षक अनिल सुर्वे जखमी झाले आहेत.
जमावाकडून धुलाई
या घटनेनंतर हाॅटेल आणि हाॅटेलच्या बाहेर एकच गाेंधळ उडाला हाेता. जमावाने आशीर्वाद आयरे यांना घटनेबाबत जाब विचारला. मात्र, त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त जमावाने त्यांची धुलाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.