पीडित, अनाथ महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न
By admin | Published: November 20, 2014 10:50 PM2014-11-20T22:50:17+5:302014-11-21T00:40:36+5:30
प्रतिभा महिला वसतिगृह : अत्याचारग्रस्त, निराधारांना शासनाचा दिलासा
महिलांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता ग्रामीण आणि शहरी भाग असे स्वतंत्र राहिले नसून, ग्रामीण भागाचेही झपाट्याने शहरीकरण होऊ लागले आहे. त्यामुळे महिलांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडू लागली आहे. समाजाची मानसिकता बदलू लागली आहे. नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रियांबरोबरच आता घरात राहाणाऱ्या स्त्रियांची सुरक्षितताही धोक्यात येऊ लागली आहे. अत्याचाराने पीडित अशा महिलेला समाजाकडूनही अवहेलना सोसावी लागते. मग त्यातूनच तिला वैफल्य येते आणि ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते. यात अगदी अल्पवयीन मुलीपासून प्रौढ महिलांचा समावेश आहे. आज अशा अत्याचाराच्या घटना दरदिवशीच वाचायला, ऐकायला मिळतात. म्हणूनच अशा महिलांना आधार देण्यासाठी शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे शासकीय महिला निवारा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
अजूनही आपल्या समाजात पुरूषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा आहे. त्यामुळे स्त्रीकडून क्षुल्लकशी जरी चूक झाली तरी ती तिच्यासाठी अक्षम्य अशीच असते. एवढेच नव्हे; तर बरेचदा पुरूषप्रवृत्तीला तिला बळी जावे लागते. अशावेळी समाजही त्या स्त्रीच्या बाजूने न राहता त्या पुरूषाचे समर्थन करतो आणि शिक्षा अखेर त्या स्त्रिला भोगावी लागते. परिणामी याची शिक्षा म्हणून ती स्वत:च मरणाला जवळ करते. समाजात असे अनेक प्रकार घडतात.
अशा अत्याचारग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी शासनाच्या जिल्हा व महिला बाल विकास विभागातर्फे महिलागृहे उभारण्यात आली आहेत. रत्नागिरीतही १८ ते ४० वयोगटातील निराश्रित, परित्यक्ता, कुमारी माता, बलात्कारित अथवा संकटग्रस्त महिलांना रत्नागिरी जिल्हा बालकल्याण समितीच्या आदेशाने आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे महत्वपूर्ण कार्य शासकीय प्रतिभा महिला वसतिगृह ही संस्था स्थापनेपासून करीत आहे. सध्या या महिलागृहात १९ महिला आणि दोन नवजात बालके आहेत.
१९७९ - ८० च्या सुमारास या महिलागृहाची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत रात्री - अपरात्री येणाऱ्या पीडित, अत्याचारग्रस्त अशा अनेक महिलांना या महिलागृहाने आधार दिला आहे. या महिलागृहात आलेल्या महिलांना अन्न, वस्त्र व निवारा या सुविधा देतानाच आवश्यकतेनुसार त्यांना वैद्यकीय सुविधा तसेच व्यवसाय प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या साऱ्या सुविधा मोफतच दिल्या जातात. काही मुलींना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चुकीमुळे आई वडिलांनी काही कालावधीकरिता या महिलागृहात आणून ठेवले आहे. मात्र, महिलांना या महिलागृहात कुठेही हिणकस वागणूक न देता त्यांना त्यांच्या वास्तव्यात अधिकाधिक स्वावलंबी बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. या संस्थेत आलेल्या कुमारीमातेच्या पुनर्वसनाबरोबरच तिच्या बाळाच्या पुनर्वसनाचीही जबाबदारी ही संस्था उचलते. काही वेळा तिच्या घरची मंडळी स्वीकारतही नाहीत. अशावेळी संस्थाच तिचे पालकत्व स्वीकारते. संस्थेत एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या महिलेला संस्थेतील अन्न, वस्त्र, निवारा या सुविधा मिळतातच. पण ‘माहेर’ योजनेचा लाभ एक वर्षाकरिता मिळू शकतो. या योजनेंतर्गत वर्षभर एक हजार रूपये दरमहा तिला दिले जातात. तिच्याबरोबर तिचे एक मूल असेल तर त्यालाही वर्षभर दरमहा ५०० रूपये मिळतात. दुसरे मूल असेल तर त्याला दरमहा ४०० रूपये मिळतात. या संस्थेत येणाऱ्या अविवाहिता अथवा घटस्फोटित महिलांच्या विवाहासाठीही संस्था प्रयत्न करते. कायदेविषयक मार्गदर्शनही देण्यात येते. या संस्थेत एक ते तीन वर्षे राहण्याची मर्यादा असली तरी काही वेळा त्या स्त्रीचे आप्त तिचा स्वीकार करून तिला परत नेतातच असे नाही. अशावेळी संस्था तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलते. संस्थेंतर्गत अगरबत्त्या बनविणे, मेणबत्ती, पापड आदी पदार्थ बनविणे आदींचे प्रशिक्षण मिळाल्याने त्यातून तिला रोजगार मिळतो. या संस्थेत तर बालगृहातून आलेल्या अनाथ मुली आज विविध ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांचे भवितव्य घडविण्याचे कामही ही संस्था करीत आहे. घरच्यांनी, समाजाने झिडकारले असले तरीही शासकीय प्रतिभा महिला वसतिगृहाच्या रूपाने त्यांना सुरक्षित निवारा मिळाल्याने त्याच्या छायेखाली त्या आपले जीवन आनंदाने, नि:शंकपणे व्यतित करीत आहेत.
- शोभना कांबळे
समाजाच्या विविध घटकांचे सहकार्य
आज अनेक संस्था अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना सुरक्षित निवारा मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. समाजात अशा अन्यायग्रस्त, पीडित अनेक महिला दिसतात. पण, त्यांना मदत करणाऱ्यांची संख्या फार कमी दिसते. आपणही समाजाचे जबाबदार घटक आहोत, याची जाणीव ठेवून अशा स्त्रीला मदत करण्यासाठी पुढे आलो तर निराशेतून आत्महत्या करणाऱ्या अनेक महिलांचे जीव वाचण्यास नक्कीच हातभार लागेल. शासन अशा महिलांना सुरक्षित निवारा मिळवून देत आहे. मात्र, अशा महिलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत त्याची माहिती होणे आज तेवढेच गरजेचे आहे. संस्थेचा पत्ता : अधीक्षक, शासकीय प्रतिभा महिला वसतिगृह, १३१५, अभ्यंकर कपांऊंड, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, रत्नागिरी.