राजापुरात आरक्षणाकडे लक्ष
By Admin | Published: September 26, 2016 10:23 PM2016-09-26T22:23:35+5:302016-09-26T23:15:52+5:30
सर्वच पक्षांना उत्सुकता : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
राजापूर : नगरपरिषदेपाठोपाठ जिल्हा परिषदेसह पंचायत समिती गणांच्या आरक्षणाकडेही आता संपूर्ण तालुकावासीय राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. राजापुरातील जिल्हा परिषदेचे सहा गट, तर पंचायत समितीच्या बारा गणांचे आरक्षण कोणत्या प्रवर्गात जाहीर होते, याचीच जोरदार उत्सुकता विविध राजकीय पक्षांना लागून राहिली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुका अपेक्षित असून, त्याबाबत जिल्हा परिषदेचा गट व पंचायत समितीचा गण यांची आरक्षणे पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी जिल्हा परिषद गटांसह पंचायत समितीच्या रचनेत राजापुरात कुठलाच बदल न झाल्याने जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे बारा गण कायम राहिले आहेत. गतवेळी जिल्हा परिषदेच्या सहा गटांमध्ये ओणी ओबीसी महिला, पाचल सर्वसाधारण - महिला, केळवली- ओबीसी, कोदवली - सर्वसाधारण, सागवे- ओबीसी, देवाचेगोठणे - सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले होते. बारा पंचायत समित्यांमध्ये ओझर - ओबीसी, भालावली - ओबीसी महिला राखीव, देवाचेगोठणे - ओबीसी महिला राखीव, केळवली - सर्वसाधारण महिला, ताम्हाने सर्वसाधारण - महिला, अणसुरे - सर्वसाधारण - महिला, कोदवली सर्वसाधारण महिला व कोंड्येतर्फ सौंदळ, पाचल, ओणी, सागवे व साखरीनाटे असा सर्वसाधारणमधील आरक्षणांचा सामावेश होता. साधारण आरक्षण पाच वर्षांनी बदलत असते. यावेळी आपल्या मनाप्रमाणे आरक्षण पडेल का? याचीच उत्सुकता अनेक ठिकाणी लागून राहिली आहे. सर्वच पक्षांतील इच्छुक आपापली मोट बांधून तयारही झाले आहेत. केव्हा एकदा आरक्षण जाहीर होते व आम्ही अर्ज भरतोय, याची ओढ अनेकांना लागून राहिली आहे. यामध्ये प्रामुख्याने दरवर्षीप्रमाणे ओणी, पाचल, केळवली व सागवे या जिल्हा परिषद गटांत, तर पाचल, ओणी, ओझर, सागवे, केळवली, कोदवली या पंचायत समित्यांच्या गणात आतापासूनच स्पर्धा पाहायला मिळत आहे. भविष्यात ही स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. यावर्षी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्याकडेही नजरा ठेवून तालुक्यातील कोणता जिल्हा परिषद प्रभाग महिला ओबीसी म्हणून आरक्षित होतो, याकडे येथील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. तशीच परिस्थिती तालुक्याच्या सभापतीपदाबाबत आहे. या पदाचे आरक्षण कुठल्या प्रवर्गासाठी पडते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, आता सर्वांनाच आरक्षणाचे वेध लागले आहेत. (प्रतिनिधी)
आरक्षणाचीच चर्चा : कोणाचा पत्ता कट होणार, कोणाला लॉटरी?
आगामी निवडणुकांचे पडणारे आरक्षण कसे असणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आरक्षणात आपला प्रभाग जाईल की काय, याची धास्ती काहींना आहे. मागील वेळी आरक्षणात पत्ता कापला गेलेल्या काहींना निदान यावेळी तरी नशीब योग्य साथ देईल का? याचीच चिंता आहे. कोणाचा पत्ता कट होणार, कोणाला लॉटरी लागणार याकडे लक्ष आहे. तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांत मात्र आता आरक्षणाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.