चिपळुणात पावसाळ्यापूर्वी ऑटोमॅटिक रेन गेझ व रिव्हर गेझ सिस्टिम बसवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:29 PM2022-04-15T18:29:15+5:302022-04-15T18:29:43+5:30
त्याचबरोबर पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल, याचेही नियोजन बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी चिपळूण बचाव समितीसोबत झालेल्या बैठकीत दिली.
चिपळूण : पावसाळ्यामध्ये महाजनकोशी समन्वय राखून संपर्क यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यत्वेकरून पब्लिक ॲड्रेस सिस्टिम कार्यान्वित करण्यात येईल. याशिवाय ऑटोमॅटिक रेन गेझ सिस्टिम व ऑटोमेटिक रिव्हर गेझ सिस्टिम चार ठिकाणी बसवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल, याचेही नियोजन बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी चिपळूण बचाव समितीसोबत झालेल्या बैठकीत दिली.
चिपळूण बचाव समितीच्या समन्वयाने प्रशासनाने सकारात्मक कृती योजना आखली आहे. बचाव समिती व प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्यात झालेल्या बैठकीत विविध स्वरूपाची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित कार्यालयांवर कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवनदी व वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे व टाकण्याच्या कामात हलगर्जी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या तातडीच्या बैठका पार पडल्या.
रत्नागिरीत जिल्हा प्रशासनाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तातडीचे निर्देश जारी करण्यात आले. त्यामध्ये एप्रिल महिन्यांत काय करायचे याचेही नियोजन करण्यात आले. चिपळूण येथे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी चिपळूण बचाव समितीशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यामध्ये प्रांताधिकारी यांनी आपण कृती योजना आखली असल्याचे सांगितले.
त्यानुसार नद्यांचे सीमांकन त्वरित करण्याची सूचना भूमी अभिलेखला दिल्याची माहिती दिली. शिवनदीतील काढलेला गाळ हा लवकरात लवकर उचलला जाईल. झाडेही उचलण्याचे कामही दोन-तीन दिवसांत सुरू होईल, असे स्पष्ट केले आहे. महाजनकोशी समन्वय राखून येत्या आठ दिवसांमध्ये यासंदर्भात बैठक होऊन नियोजन करण्यात येईल. पाटबंधारे खात्याच्या सहकार्याने बोल्डर तातडीने टाकता येईल का? याची आपण माहिती घेऊ, असे प्रांताधिकारी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी माहिती देताना सांगितले की, नगर परिषदेने शहरातील चार भागांत भोंगे लावलेले आहेत. पेठमाप भागातील शहर विकास आराखड्यातील रस्त्याला संरक्षण भिंत बांधण्याकरिता अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश चिपळूण नगर परिषदेला देण्यात आलेले आहेत. या बैठकीला चिपळूण बचाव समितीचे सतीश कदम, शिरीष काटकर, अरुण भोजने, राजेश वाजे, शहानवाज शहा उपस्थित होते.