मंडणगडात आत्मदहन, खेडात उपोषण
By admin | Published: August 8, 2016 10:31 PM2016-08-08T22:31:58+5:302016-08-08T23:41:14+5:30
तीन उपोषणे : सोवेली - बौद्धवाडीवासीयांचा तेरा वर्षे सुरू आहे पाण्यासाठी संघर्ष
मंडणगड : स्वातंत्र्यदिनी तीन उपोषणांसह एकूण चार निवेदने प्रशासनाला देण्यात आली आहेत. यामध्ये पाण्यासाठी तेरा वर्षे संघर्ष करुनही यश न मिळालेल्या सोवेली - बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याचे पाण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे़ तसेच मंडणगड नगरपंचायत प्रभाग क्रमांक ९ येथील नगरसेविका दक्षता सापटे या आरोग्यसेवक शरद सापटे यांच्याविरोधात उपोषण करणार आहेत़ तर बाणकोट येथील ग्रामस्थ शफी करेल यांनी भूमिअभिलेख खात्याविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे़ मंडणगड आगारातील चार कर्मचारी वरिष्ठांना लावलेल्या चुकीच्या व अन्यायकारक ड्युटीविरोधात उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. रिपाइंचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व सोवेली - बौध्दवाडी येथील सुनील तांबे यांनी ग्रामस्थांच्यावतीने स्वातंत्र्यदिनी मंडणगड तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे़ सोवेली गावातील सर्व वाड्यांसाठी उभारलेल्या नळपाणी योजनेतून बौध्दवाडीला पाणी मिळावे, यासाठी वाडीतील ग्रामस्थ २००३ सालापासून प्रशासनसह विविध पातळ्यांवर संघर्ष करत आहेत. मात्र, गावातील आदिवासी व बौध्दवाडीतील ग्रामस्थांना या योजनेतून पाणीपुरवठा केला जात नाही. या पाण्यापासून बौध्दवाडीतील ग्रामस्थ आजही वंचित आहेत. त्यामुळे पाण्याशिवाय तडफडत जगण्यापेक्षा आत्मदहन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे़ ग्रामस्थांनी मंडणगड तहसीलदारांसह पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे़ (प्रतिनिधी)
ग्रामस्थ ठाम : आजही वंचित
स्वातंत्र्यदिनी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले जाते. मंडणगड तालुक्यातील सोवेली - बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी गेले तेरा वर्ष लढा सुरू आहे. त्याला अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी १५ आॅगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.