शृंगारपूर ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 02:01 PM2019-09-13T14:01:54+5:302019-09-13T14:03:41+5:30
संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेत ४१ विद्यार्थी असून, सातवीपर्यंत फक्त दोन शिक्षकच कार्यरत आहेत. या दोनही शिक्षकांची बदली करण्यात आली असून, अद्याप एकही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर शुक्रवारी शाळेलाच टाळे ठोकले.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेत ४१ विद्यार्थी असून, सातवीपर्यंत फक्त दोन शिक्षकच कार्यरत आहेत. या दोनही शिक्षकांची बदली करण्यात आली असून, अद्याप एकही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर शुक्रवारी शाळेलाच टाळे ठोकले.
शृंगारपूर शाळेतील कार्यरत दोन शिक्षकांची बदली झाल्यानंतर या शाळेवर अद्याप एकाही शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. शाळेवर शिक्षक मिळून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येथील ग्रामस्थ व पालक जूनपासून शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यानंतरही अद्याप शिक्षक देण्यात आलेला नाही. अखेर शिक्षक मिळत नसल्याने ग्रामस्थ व पालकांनी शुक्रवारी सकाळी शाळा बंद आंदोलन पुकारले.
शिक्षक मिळावा म्हणून पालकांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. पण त्यांच्याकडून पालकांना प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवारी सकाळी शाळा बंदची कल्पना देऊनही प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी सोडाच केंद्रप्रमुखही न पोहचल्याने ग्रामस्थ व पालक झाले आक्रमक झाले होते.
ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सकाळी ११.३० वाजता केंद्रप्रमुख महेश जाधव एक शिक्षिका घेऊन शाळेत हजर झाले. दुसऱ्या शिक्षकाला आपण सोमवारपर्यंत हजर करतो, आपण हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केली. मात्र, त्यानंतर आधी दुसरापण शिक्षक आणा तरचं शाळा उघडू असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे केंद्रप्रमुखांनी तेथून काढता पाय घेतला.