अनावश्यक प्रवास टाळा : मोहितकुमार गर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:36+5:302021-06-03T04:22:36+5:30
रत्नागिरी : लॉकडाऊन काळात अनावश्यक जिल्हा प्रवास टाळा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे. ...
रत्नागिरी : लॉकडाऊन काळात अनावश्यक जिल्हा प्रवास टाळा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्याच्या आनुषंगाने दि. २ जून २०२१ रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून दि. ९ जून २०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या सीमा अन्य जिल्ह्यांतून प्रवेश करण्यासाठी किंवा अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी बंद करण्यात येत आहेत. केवळ नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी व कोविड-१९ व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा आणीबाणीच्या प्रसंगी प्रवास करण्यास मुभा दिली जाणार आहे.
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला ४८ तास आधी केलेली कोविड -१९ चाचणी निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र, पोलीस विभागाचा ई-पास सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगतानाच नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, अशी सूचना डॉ. गर्ग यांनी केली आहे.