माध्यमिक शिक्षक कोरोना लसीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:17+5:302021-04-07T04:32:17+5:30
टेंभ्ये : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सर्व प्रकारच्या आपत्तीजनक सेवेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ...
टेंभ्ये : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सर्व प्रकारच्या आपत्तीजनक सेवेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम केलेले असतानाही अद्यापही या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर समजून लसीकरण करण्यात आले नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण केले जाते; मग माध्यमिक शिक्षकांचे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूची पहिली लाट थोपविण्यासाठी शासन स्तरावरून करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. शासन स्तरावरून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याबाबतचे आदेश असतानाही जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अद्याप लसीकरण करण्यात आलेले नाही. प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले. परंतु, माध्यमिक शिक्षकांबाबत अद्यापही आदेश काढलेला नाही. यामुळे माध्यमिक शिक्षक हे प्रशासनाची जबाबदारी नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोट
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी वारंवार रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे शिक्षण विभागाकडे करण्यात येत आहे; परंतु शिक्षण विभागाने अद्यापही या संदर्भात कार्यवाही केलेली नाही. राज्याच्या मुख्य सचिवांनी ‘ब्रेक द चेन’ संदर्भात काढलेल्या परिपत्रकामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षांच्या अनुषंगाने संबंधित शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे अथवा परीक्षेपूर्वी अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोरोना चाचणी करण्यात यावी, असा आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने कोरोना चाचणीऐवजी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवरील सर्वांच्या लसीकरणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
- सागर पाटील, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ