रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची प्रतिक्षा; यंत्रणा ‘हवेतच’
By मेहरून नाकाडे | Published: August 8, 2023 01:29 PM2023-08-08T13:29:56+5:302023-08-08T13:30:20+5:30
जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळावी, नुकसानभरपाई, पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृषी विभागाने केंद्रासाठी जागेची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवून सात महिने उलटले तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नसल्याने ‘स्वयंचलित हवामान केंद्र तूर्तास हवेत’ असा सूर उमटत आहे.
हवामानातील बदलाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रावरून पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याची नोंद घेतली जाते. या नोंदीनुसार हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ होते.
मात्र महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीच्या अचूकतेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत आहेत. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारीची दखल घेत शासनाने महसूल मंडळाऐवजी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जागेची पाहणी करून कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते.
कृषी विभागाकडून ३०० ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याबाबतचा अहवाल डिसेंबरमध्ये शासनाला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप तरी हवामान केंद्र उभारण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. ग्रामपंचायत स्तरावरील हवामान केंद्राचा फायदा कृषी संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शनासाठीही होणार आहे.
प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र आहे. याद्वारे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा याची नोंद ठेवली जाते. महसूल मंडळातील गावागावातील तापमान वेगळे असल्याने नुकसानभरपाई / विमा परतावा देण्यास अडथळा उद्भवू नये यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ३०० गावात केंद्रासाठी जागेची पाहणी करून अहवाल पाठविण्यात आला आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.