कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:06+5:302021-05-03T04:25:06+5:30
मदत केंद्र सुरू रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी ...
मदत केंद्र सुरू
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. डाॅक्टर, रुग्णांचे नातेवाईक यांच्यात समन्वय असावा, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ३० स्वयंसेवक काम करीत आहेत.
डाॅक्टर उपलब्ध
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील कोरोना रुग्णालयात डाॅक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसाेय होत होती. याबाबत भाजपाचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्याशी संपर्क साधून प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात आला आहे. जिल्हास्तरावरून दोन डाॅक्टर उपलब्ध होणार आहेत.
खरेदीसाठी गर्दी
रत्नागिरी : कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रशासनाने सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने सुरू ठेवली जातील असा निर्णय घेतला आहे. खरेदीसाठी नागरिक सकाळच्या सत्रात गर्दी करीत आहेत. दुपारनंतर मात्र बाजारपेठेत शुकशुकाट होत आहे.
मत्स्य संग्रहालयाचे काम युद्धपातळीवर
रत्नागिरी : जिल्ह्याचे मत्स्य संग्रहालय मांडवी येथे साकारणार असून त्याचे काम प्रगतिपथवार सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी चाैथऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षभरात सुंदर इमारत उभी राहणार आहे. वर्षभरात काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.
कचऱ्याचे साम्राज्य
रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत ठिकठिकाणी रस्त्यालगत, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा नागरिक फेकत असल्याने कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. परटवणे, उद्यमनगर, क्रांतीनगर परिसरातील रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने नागरिक, पादचारी, वाहनचालकांना याचा त्रास सोसावा लागत आहे.
मंडळाकडून मदत
देवरूख : संगमेश्वर तालुक्याचे तहसीलदार सुहास थोरात यांच्या आवाहनानंतर देवरूख कोरोना केंद्रासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संगमेश्वरी भजन मंडळाने देवरूख कोरोना सेंटरसाठी पाच हजार रुपयांची मदत दिली आहे. तहरीलदारांकडे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केली आहे.
विजेचा लपंडाव
खेड : शहरासह ग्रामीण भागात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. नागरिक हैराण झाले असून यामुळे विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. लाॅकडाऊन काळात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते. मात्र, उलट विजेचा लपंडाव सुरू आहे.
ऑनलाईन मार्गदर्शन
दापोली : कृष्णामामा महाजन प्रबोधिनीतर्फे युवक-युवतींसाठी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात बँकिंग, इन्शुरन्स, रेल्वे, पोस्ट व केंद्र शासनाच्या नोकऱ्यांचा समावेश आहे.
माजी विद्यार्थी संघाची सभा
दापोली : तालुक्यातील पालगड येथील पूज्य सानेगुरुजी विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थी संघाची वार्षिक सभा संघाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिव दत्ताराम पाटणे, सुधाकर जोशी, दिलीप जाधव उपस्थित होते.