जागृती व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:37 AM2021-09-09T04:37:37+5:302021-09-09T04:37:37+5:30
दापोली : विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेंतर्गत शहरातील फॅमिली माळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाळासाहेब ...
दापोली : विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेंतर्गत शहरातील फॅमिली माळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य सामंत याने गृहिणींना मोफत गृहउद्योगाची माहिती दिली. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा तसेच दुधाचे पदार्थ बनविणे याविषयी माहिती दिली.
करमरकर यांचा सत्कार
चिपळूण : येथील महापुराच्या पाण्यात भरकटणाऱ्या साध्या बोटीचा आधार घेऊन मोबाईलच्या कमी प्रकाशात आधार घेत सुरक्षित ठिकाणी आणलेल्या चिपळूण पोलीस ठाण्याच्या पल्लवी सुर्वे, रमा करमरकर यांचा जिजाऊ ब्रिगेडतर्फे सत्कार करण्यात आला. या दोघींनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या मायलेकरांना सुरक्षित स्थळी आणले.
कलाकारांना आर्थिक मदत
मंडणगड : वारकरी साहित्य परिषद तालुका शाखा मंडणगड यांच्या वतीने कलाकार मानधन प्रश्नासंदर्भात मंडणगडचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कोरोनाकाळात भजन, कीर्तन, प्रवचन थांबले असल्याने समाजप्रबोधन करणाऱ्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार कीर्तनकार, गायक, मृदंगाचार्य यांनाही मदत मिळण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरचे खड्डे बुजविले
दापोली : ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच गेल्या वर्षापासून कोरोनामुळे एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. अखेर कळकी, नाचरेवाडी येथील ग्रामस्थ महिला आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूूंची झाडी साफ करून खड्डे बुजविले आहेत.
निबंध स्पर्धा
राजापूर : इमेल्स फाऊंडेशनच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत निबंध पाठवावे लागणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्यास हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय ८०० रुपये व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकास ५०० रुपये व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत.
पालक प्रबोधन चर्चासत्र
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित विद्याभारती व प्राथमिक विभागात ‘कोरोना : समज, गैरसमज व मुलांचे आरोग्य संगोपन’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते आयुर्वेद वाचस्पती डॉ. समीर परांजपे हे होते. त्यांनी व्याख्यानात कोरोना विषाणू आणि त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.
पुस्तकांचे वितरण
चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मुंबई विद्यापीठ पुरस्कृत मागासवर्गीय पुस्तकपेढी या योजनेंतर्गत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एससी, एसटी, डीटी आणि एम.टी. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवाळे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. चांदा, प्रा. राहुल पवार व ग्रंथपाल सुधीर मोरे, आदी उपस्थित होते.
फॉग मशीन भेट
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते ग्रामपंचायतीसाठी सरपंच विकास गमरे यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांनी फॉग मशीन सुपुर्द केले. यावेळी मंदार भास्कर जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, बाळा कदम, माजी सरपंच अरुण भुवड, उपसरपंच गजानन महाडिक, आदी उपस्थित होते.
इंटरनेट सेफ्टीवर वेबिनार
दापोली : येथील दापोली अर्बन बँक, सीनिअर सायन्स कॉलेजमध्ये संगणकशास्त्र, वाणिज्य विभाग आणि एस. यू. एसई यांच्यातर्फे सायबर रेझिलिअन्स ॲण्ड इंटरनेट सेफ्टी या विषयावर नुकताच वेबिनार आयोजित करण्यात आला होता. योगेश वाघ यांनी यावेळी इंटरनेटचा उपयोग आणि त्याच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली.
शिक्षक दिन कार्यक्रम
पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘थँक अ टीचर्स’ या अभियानांतर्गत शिक्षक कार्यगौरव सप्ताहानिमित्ताने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, निबंध स्पर्धा, आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.