Baba Ramdev: CM उद्धव ठाकरेंचं काम चांगलं, ED धाडसत्रावरही रामदेव बाबांनी मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 10:42 PM2022-03-08T22:42:50+5:302022-03-08T22:44:02+5:30
११ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरीकरांना रामदेव बाबा यांच्या सानिध्यात योग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
मुंबई -जागतिक महिला दिनानिमित्त 9 मार्च रोजी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पहाटे 5 वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी योगगुरू बाबा रामदेव हे रत्नागिरीत आले आहेत. यावेळी, पत्रकारानी त्यांना घेरले असता, विविध मुद्द्यांवर त्यांनी आपलं मत मांडलं. यावेळी, महाराष्ट्र राज्यात ईडीचं सुरू असलेलं धाडसत्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम यावरही त्यांनी बिनधास्तपणे भाष्य केलं. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम चांगलं असल्याचं ते म्हणाले.
११ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरीकरांना रामदेव बाबा यांच्या सानिध्यात योग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रत्नागिरी शहराच्या आसपासच्या २० किलोमीटर परिसरातून येणाऱ्यांसाठी पतंजलीतर्फे मोफत एसटी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. रामदेव बाबा या योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर याच ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असं एक्झीट पोलमधून दिसतंय, काही लोकांना वाटलं होतं 5 राज्यांमध्ये बीजेपी रसातळाला जाईल पण तसं होत नाही, असे रामदेव यांनी म्हटले.
काँग्रेसला नेतृत्व बदलाची गरज
सोशल मिडियावर तसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, तसं होणार नाही. भाजपसोबत केजरीवालसुद्धा चांगली कामगिरी करेल. काँग्रेसला राज्य स्तरावर नेतृत्वाचा अभाव आहे राष्ट्रीय स्तरावर आणखी नेतृत्वात ओजस्वीत मिळाली तर काँग्रेस अधिक बळकट होईल, असे म्हणत काँग्रेस पक्षात बदलाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सध्याची निवडणूक सर्वांना आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळेल. बाकी, माझ्यासारखा फकीर यावर काय बोलणार असे म्हणत पाच राज्यांच्या निकालावर अधिक बोलणं रामदेव बाबांनी टाळलं.
उद्धव ठाकरेंचं काम चांगलं
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगल काम करत असल्याची कौतुकाची थाप रामदेव यांनी दिली. दरम्यानं महाराष्ट्रात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाड सत्रावर बोलताना दोन वजीर लढत आहेत, असं विधान त्यांनी केलं. मुख्य गोष्ट म्हणजे वीर सावरकर हे भारतरत्न असून त्यांना भारतरत्न मिळायला हवा. आज ना उद्या याची घोषणा नक्की होईल, असेही ते म्हणाले.