शिक्षणातही मंडणगड मागे
By Admin | Published: September 9, 2016 12:00 AM2016-09-09T00:00:12+5:302016-09-09T01:14:14+5:30
गटशिक्षणाधिकारी नाहीच : शिक्षण विभागातील अनेक महत्वाची पदे रिक्त
देव्हारे : अनेक समस्यांनी ग्रासलेला व महाराष्ट्रातील मागास तालुका असा नावलौकिक मिळवलेला मंडणगड तालुका हा शिक्षण क्षेत्रातही मागासलेलाच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याच्या शिक्षण विभागातील अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पद हे गेल्या एक वर्षापासून रिक्त आहे. या पदावर कार्यरत असलेले अधिकारी हे गेल्या वर्षी निवृत्त झाले़ त्यानंतर नांगरेपाटील यांची तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती़ मात्र, ते हजर झाले नाहीत़ त्यामुळे आजपर्यंत हे पद रिक्तच आहे. तसेच तालुक्याला तीन विस्तार अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना, यातील दोन विस्तार अधिकारी कार्यरत आहेत़ यापैकी एका विस्तार अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरीक्त कार्यभार देण्यात आला आहे़ त्यामुळे त्यांच्यावर दोन्ही पदांची जबाबदारी आहे़ तालुक्यातील चार केंद्रप्रमुख पदेही रिक्त असून, यामध्ये देव्हारे व चिंचघर केंद्राचा समावेश आहे़ मंडणगड तालुक्यात शिक्षणाचा सावळा गोंधळ सुरू आहे. यामुळे तालुक्यात शिक्षणाबाबत उदासिनता असल्याचे दिसत आहे.
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मंडणगड तालुक्यात शिक्षण विभागाला घरघर लागली असून, अतिरिक्त कार्यभार दिल्याने अधिकाऱ्यांकडून कोणतेही काम पूर्ण क्षमतेने होत असेल का? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. मंडणगड तालुक्यातील शिक्षण विभागामध्ये रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे़ (वार्ताहर)
लोकप्रतिनिधी उदासीन : तालुका दुर्लक्षित
रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून मंडणगड तालुका ओळखला जातो. याठिकाणी वाहतुकीची साधनेही कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे हा तालुका आजही दुर्लक्षितच राहिला आहे. नगरपंचायत होऊनही पाहिजे तसा विकास होताना दिसत नाही. येथील लोकप्रतिनिधी विकासाबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.