गाेळप येथील स्थलांतरित कुटुंबांकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:32 AM2021-07-31T04:32:28+5:302021-07-31T04:32:28+5:30
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप - मानेवाडी येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन खचून दाेन घरांना धोका निर्माण झाला हाेता. ...
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप - मानेवाडी येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन खचून दाेन घरांना धोका निर्माण झाला हाेता. त्यामुळे या कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, गेल्या बारा दिवसांत या कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या परिसरात १६ जुलै रोजी मोहिते यांच्या घराजवळची जमीन खचण्यास सुरुवात झाली. या परिसरात दहा ते पंधरा फूट उंचीचा भाग खचला होता. त्यानंतर घराचा अर्धा भाग जमीनदोस्त झाला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या भागाची पाहणी करण्यात आली. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधींचा नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यानंतर त्यांनी या भागाकडे लक्ष दिलेले नाही. या कुटुंबीयांचा लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर विश्वास असल्याने ते अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, याठिकाणी अद्याप लोकप्रतिनिधी आलेले नाहीत. गोळप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कुटुंबीयांना धान्याचे वाटप करण्यात आले. या परिसरासाठी कोणत्या उपाययोजना निश्चितपणे केल्या जाणार आहेत, याबाबत ग्रामपंचायतीकडून काहीही सांगितले जात नसल्याने हे कुटुंबीय नाराज आहेत.
----------------------------------------
यासंदर्भात ग्रामपंचायतीची कोणतीही उपाययोजना करण्याची मानसिकता दिसत नाही. ग्रामपंचायत आम्हाला धान्य देऊन आमची चेष्टा करत आहे. पावसाळ्यानंतर या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर आत्ताच ताेडगा काढण्याची गरज आहे.
- सागर मोहिते, ग्रामस्थ