दूध उत्पादनात पिछाडीच
By admin | Published: September 5, 2014 10:42 PM2014-09-05T22:42:34+5:302014-09-05T23:30:50+5:30
रत्नागिरी जिल्हा : उत्सव काळात हजारो लीटर दूर परजिल्ह्यातूनच
खाडीपट्टा : गणेशोत्सव काळात दुधाला वाढीव मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे दुग्धोत्पादन होत नसल्याने जिल्ह्याबाहेरुन दुधाची आवक होत आहे. गणेशोत्सवात सुमारे ५० हजार लीटर दूध जिल्ह्याबाहेरुन आणले जात होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुग्धोत्पादनाचे प्रमाण फारच कमी असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे.
जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात गुरेढोरे पाळली जातात. गायी, म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुटुंबाची गरज भागवली जाते. पण, जनावरांच्या तुलनेत दुग्धोत्पादनही खूप कमी होत आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनाला जिल्ह्यात ऊर्जितावस्था आलेली नाही. जिल्ह्यात दुधाची गरज भागवण्यासाठी परजिल्ह्यातून दूध मागवावे लागते. चाऱ्याची टंचाई, व्यापारी तत्त्वावर दूध उत्पादन करण्याची मानसिकता नसते. दूध संकलनाच्या साखळीखालील त्रुटी आदी कारणांमुळे जिल्ह्याबाहेरील दुधावर जिल्हावासीयांना अवलंबून राहावे लागते.
जिल्ह्यात घरगुती दूध उत्पादन सुमारे २० हजार लीटरच्या घरात आहे. मात्र, जिल्ह्याची गरज भागविण्यासाठी याव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेरुन रोज ३५ ते ४० हजार लीटर दूध येते. गणेशोत्सवात मुंबई, पुणे तसेच अन्य भागातून हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. यामुळे गणेशोत्सवात अतिरिक्त दुधाची मागणी लक्षात घेता या अतिरिक्त सुमारे ५० हजार लीटर दूध मागवले जाते. शासकी दूध विक्री बंद झाल्याने ग्राहकांना हा फटका बसत आहे.
आरे दूध विक्री सुरु ठेवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न झालेले नाहीत. गोकुळ दूध संघ ही जिल्ह्यातील दूध एकत्रित करुन कोल्हापूर येथे पॅकिंगसाठी घेऊन जातो. यापूर्वी जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ स्थापन करुन वारणा ब्रँडने दूध विक्रीचा प्रयत्न झाला. त्यानंतर तीन वर्षे चालल्यानंतर तोट्यात गेल्याने हा प्रकल्पही बंद करण्यात आला. जिल्ह्यात असे प्रकल्प नसल्याने दूध पॅकिंग करुन जिल्ह्यात आणून विकले जाते. (वार्ताहर)
सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात ओला चारा उपलब्ध होत असल्याने या काळात दुग्धोत्पादन वाढते. मात्र, अलिकडच्या काळात त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले जात नसल्याने पावसाळ्यातही उत्पादन घटले आहे. ही बाब गंभीर असून, संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.