परतीच्या प्रवासाची एसटीकडून सज्जता
By admin | Published: August 29, 2014 10:14 PM2014-08-29T22:14:57+5:302014-08-29T23:08:43+5:30
के.बी. देशमुख : ८१० गाड्यांचे आरक्षण
रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर गावाकडे परतली आहेत. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी एस. टी.कडून सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत परतीच्या ८१० गाड्यांचे आरक्षण झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी यावेळी दिली.
गणेशोत्सव म्हणजे सर्व सणांचा राजा. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. यावर्षी कोकणात १९१३ जादा गाड्या आल्या असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २१३ गाड्या अधिक आल्या आहेत. रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या आल्या आहेत.
अवजड वाहनांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळला असला तरी गणपतीसाठी कोकणात खासगी कार, गाड्याने येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामार्गावर गर्दी दिसूून येत आहे. एस. टी.ची वाहतूक मात्र नेहमीच्याच मार्गावरून सुरू आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून १९१३ जादा गाड्या प्रवाशांना घेऊन आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८१० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.
दररोजच्या १५० गाड्यावगळता दि. ४ ते १० सप्टेंबरअखेर ८१० गाड्यांचे एस. टी. प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. दि. ४ रोजी ८१, दि. ५ रोजी २००, दि. ६ रोजी २९०, दि. ७ रोजी १५०, दि. ८ रोजी ५०, दि. ९ रोजी ३०, दि.१० रोजी ९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. दि. ६ रोजी सर्वाधिक गाड्या मुंबईकडे सोडण्यात येणार आहेत. प्रत्येकाला तिकीट मिळण्याची सुविधा राज्य परिवहन महामंडळाने केली आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त मुंबईहून तसेच बाहेरून येणार, हे गृहित धरून एस. टी. प्रशासनाने भक्तांसाठी येणाऱ्या व परतीच्या गाड्यांचे चोख नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)