बहुजनांचा एल्गार
By admin | Published: January 17, 2017 12:07 AM2017-01-17T00:07:01+5:302017-01-17T00:07:01+5:30
हजारोंचा सहभाग : रत्नागिरीत बहुजन क्रांती मोर्चा
रत्नागिरी : ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ अशी गर्जना करीत विविध मागण्यांसाठी सोमवारी बहुजनांचा विराट मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हजारोंच्या संख्येने बहुजन यामध्ये सामील झाले होते. यावेळी आपल्या प्रलंबित ४१ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना या शिष्टमंडळाने सादर केले.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण होत आली, तरीही अजून बहुजन समाज आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहे. अद्याप ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची जातनिहाय गणना झालेली नाही. नॉनक्रिमिलेअरची अट जाचक असल्याने बहुजन समाजाच्या मुलांना उच्च शिक्षण घेणे अवघड झाले आहे. याचबरोबर इतरही अनेक समस्यांना बहुजन समाजाला सामोरे जावे लागत होते. याबाबत न्याय मिळावा, तसेच अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, यासाठी बहुजन समाज क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते.
सोमवारी येथील चंपक मैदानापासून हजारो बहुजनांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. या मोर्चात अठरा पगड जातींमधील बांधवांचा समावेश होता. संविधानाची १०० टक्के अंमलबजावणी करून आमचे न्याय्य हक्क आम्हाला द्या, ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती. या मोर्चाला सुमारे प्रमुख ४० समाज संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
हा मोर्चा मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज, बापूजी साळुंखे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन तडक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी प्रवेशद्वारावर हा मोर्चा धडकला. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना विविध ४० मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील, शब्बीर अन्सारी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व भंडारी समाजनेते कुमार शेट्ये, खारवी समाजाचे सुधीर वासावे, कटबू समाजाचे बी. टी. मोरे, कुणबी समाजाचे तानाजी कुळ्ये, सुरेश भायजे, चर्मकार समाजाच्या गीता राठोड, तेली समाजातर्फे दीपक राऊत, ककैया समाजाचे आप्पासाहेब सोनावणे, बौद्ध समाजाचे संजय कदम, बी. के. पालकर, सुतार समाजाचे चंद्रकांत पांचाळ आणि वडार समाजाचे नागेश पाथरट, आदी विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलिसांचा फौजफाटा
आपल्या न्याय हक्कांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण शहराला पोलिस चौक्यांचे स्वरूप आले होते.
‘ते’ पाटलांचे वारसदार...
अस्पृश्य महिलेवर अत्याचार केले म्हणून शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांचे हात छाटले. त्यावेळी त्यांनी ‘अॅट्रॉसिटी’ चोख बजावली; परंतु जे अॅट्रॉसिटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते शिवरायाचे नव्हे, तर राजांच्या पाटलांचे वारसदार असल्याची टीका पल्लवी राठोड या तरुणीने केली.