बालगंधर्व पुरस्कार प्रथमेश लघाटेला, २ सप्टेंबरला वितरण : पुणेतील भारत गायन समाजातर्फे जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:45 PM2018-08-29T15:45:18+5:302018-08-29T15:49:35+5:30
पुणे येथील भारत गायन समाजाचा मानाचा समजला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सारेगमप लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे याला जाहीर झाला आहे.
रत्नागिरी : पुणे येथील भारत गायन समाजाचा मानाचा समजला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सारेगमप लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे याला जाहीर झाला आहे. दि. २ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रथमेशला सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायक विजय बक्षी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
नाट्यसंगीतामध्ये प्रथमेशचा हातखंडा आहे. शिवाय दूरदर्शन, प्रकाश संगीतातील विविध सण आणि चित्रपट संगीत कार्यक्रम केले आहेत. युनिव्हर्सल म्युझिक इंडिया आणि झी मराठी यांनी महाराष्ट्रातील संगीत समृध्द परंपरेचे प्रदर्शन करणाºया अल्बमच्या निर्मितीमध्ये प्रथमेशचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, गोवा, रत्नागिरी, ठाणे, नागपूर, वर्धा आणि भोपाळ इत्यादींसारख्या अनेक शहरांमध्ये लिटिल चॅम्प लाइव्ह शो आणि दुबई, अबूधाबीसारख्या ठिकाणी प्रथमेशने लिटिलचॅम्प्स् मित्रांबरोबर कार्यक्रम सादर केले आहेत.
प्रथमेशचे संगीत विषयातील प्राथमिक शिक्षण सतीश कुमटे यांच्याकडे झाले. त्यानंतर प्रसाद गुळवणी, जयतीर्थ मेवुंडी, पं. अच्युत अभ्यंकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले. सध्या तो सुरेश बापट (ठाणे) यांच्याकडे शिकत आहे. प्रथमेशला जाहीर झालेल्या बालगंधर्व पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.