रत्नागिरीतील 'या' पर्यटन ठिकाणांवर बंदी, पोलिस प्रशासनाची करडी नजर
By शोभना कांबळे | Published: July 26, 2023 02:21 PM2023-07-26T14:21:41+5:302023-07-26T14:35:10+5:30
रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या काही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने सवतकडा, खोरनिनको, प्रभानवल्ली आदी ठिकाणांवर बंदी घालण्यात ...
रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या काही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने सवतकडा, खोरनिनको, प्रभानवल्ली आदी ठिकाणांवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
पावसाळ्यात धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होतात. त्यामुळे हे मनोहर दृश्य पाहाण्यासाठी तसेच या धबधब्यांखाली स्नानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनप्रेमी मोठ्या संख्येने अशा धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी जातात. सध्या पावसाळ्यात धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाल्याने या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. मात्र, काही वेळा धबधब्यांच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात. काही वेळा जीवघेण्या घटनाही घडतात. यापुर्वी काही धबधब्यांवर अशा घटना घडल्या आहेत. काही पर्यटक सेल्फीच्या नादात पाय घसरून पडल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडू लागल्या आहेत.
सध्या मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धबधब्यांच्या ठिकाणी पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना पायबंद व्हावा, या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यात चिपळूण तालुक्यातील सवतकडा, लांजा तालुक्यातील खोरनिनको, प्रभानवल्ली आदी धोकादायक ठिकाणच्या धबधब्यांवर बंदी घालण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
काही धबधब्यांवर नियमित गस्त ठेवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आल्याचेही सांगितले.