धबधब्यांवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:50+5:302021-06-24T04:21:50+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील पानवल, रानपाट, शीळ, निवेंडी, निवळी, ऊक्षी या ठिकाणच्या धबधब्यांवर जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. कोरोनामुळे सध्या ...
रत्नागिरी : तालुक्यातील पानवल, रानपाट, शीळ, निवेंडी, निवळी, ऊक्षी या ठिकाणच्या धबधब्यांवर जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. कोरोनामुळे सध्या सर्वच ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोविड सेंटरला मदत
राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथील जय गणेश मित्रमंडळाच्यावतीने धारतळे येथील कोविड सेंटरला आर्थिक मदत करण्यात आली. धारतळे येथे नव्याने कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. तेथील रुग्णांना उपयोगी पडेल, असे साहित्य दानशुरांकडून दिले जात आहे. जय गणेश मित्रमंडळाने त्यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष समीर आडिवरेकर, उपाध्यक्ष अभिजीत गुरव, खजिनदार नानू आडिवरेकर उपस्थित होते.
रोहन बनेंची निवड
रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी रोहन बने यांची निवड झाली आहे. या असोसिएशनमध्ये अनेक ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे.
पर्यटकांवर कारवाई
रत्नागिरी : तालुक्यातील पिरंदवणे टोळवाडी येथील बंधाऱ्यातील धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर ग्रामीण पोलीस व पिरंदवणे ग्रामपंचायतीने कारवाई केली. येथे आलेल्या ३० पर्यटकांवर कारवाई करण्यात आली.
बिबट्याचा संचार
साडवली : कोंडिवरे येथे पुन्हा बिबट्याचा संचार सुरू झाला आहे. बिबट्याने सुजीत पवार यांचे वासरू ठार मारल्याची घटना घडली होती. बिबट्याचा वावर सुरू झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शिवराज्यभिषेक दिन साजरा
रत्नागिरी : पाली तिठा येथे बुधवारी ३४८ वा शिवराज्यभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. गेली १८ वर्ष हा दिन साजरा केला जात आहे. यावेळी शिवछत्रपतींना दुग्धाभिषेक करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
परीक्षेबाबत अनिश्चितता
रत्नागिरी : शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.