बँक आॅफ इंडियातर्फे लवकरच ई गॅलरी
By admin | Published: July 20, 2014 10:43 PM2014-07-20T22:43:40+5:302014-07-20T22:46:26+5:30
जिल्ह्यात अजूनही ५० एटीएम
चिपळूण : ग्राहकांना सेवा अधिक चांगल्या प्रकारे देता यावी, यासाठी जिल्ह्यात अजूनही ५० एटीएम मशिन्स कार्यान्वित केली जाणार आहेत. विविध शाखांमधून पैसे भरण्याची यंत्रणा पासबुक प्रिंटिंग यंत्रणा उपलब्ध होणार आहे. ग्राहक सेवेचा एक भाग म्हणून लवकरच ई गॅलरी ही नवीन सेवा सुरु होणार असल्याचे बँक आॅफ इंडियाचे झोनल मॅनेजर विनायक बुचे यांनी येथे सांगितले.
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात बँक आॅफ इंडिया चिपळूण शाखा, लोटे, सावर्डे, बहादूरशेख नाका, पेढांबे या शाखांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी बुचे यांनी केले. जुलै महिना हा बँक आॅफ इंडियातर्फे किसान मास म्हणून साजरा केला जातो. १९ जुलै १९६९ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले व बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे स्वप्न सत्यात उतरले. याचे औचित्य साधून हा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला चिपळूणचे शाखाधिकारी प्रभाकर पाटील, कृषी सहाय्यक आर. के. जाधव, वृषाली कदम, कृष्णा खांबे, दिलीप पवार आदींसह विविध शाखांचे शाखाधिकारी व शेतकरी ग्राहक उपस्थित होते.
प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना विमा, दुर्गम भागात बँकिंग सेवेसाठी व्यवसाय मदतनिसाची नियुक्ती या मुद्द्यांवरही बुचे यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. २४ तास ई गॅलरीत ही नवीन सेवा उपलब्ध होणार आहे, या नव्या सुविधेचा फायदा शेतकरी घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. बँकेच्या विविध कर्ज योजनांविषयी बँकेच्या शेती अधिकारी वृषाली कदम यांनी मार्गदर्शन केले. शरद तांबे यांनी आभार मानले. (वार्ताहर)