कोरोना काळातही बँकेची सकारात्मक वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:07+5:302021-09-23T04:36:07+5:30

राजापूर : कोरोना संकटकाळाची झळ जशी इतर क्षेत्रांना बसली तशी ती बँकींग क्षेत्रालाही बसली आहे; मात्र अशाही काळात राजापूर ...

The bank's positive performance during the Corona period | कोरोना काळातही बँकेची सकारात्मक वाटचाल

कोरोना काळातही बँकेची सकारात्मक वाटचाल

Next

राजापूर : कोरोना संकटकाळाची झळ जशी इतर क्षेत्रांना बसली तशी ती बँकींग क्षेत्रालाही बसली आहे; मात्र अशाही काळात राजापूर अर्बन बँकेने ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून आपली ध्येयधोरणे आखली. त्याचा सकारात्मक परिणामही प्रकर्षाने दिसून आला. या संकट काळातही बँकेचे ठेवीदार, कर्जदार सभासदांनी केलेल्या अनमोल सहकार्यामुळे बँकेला या संकटकाळात यशस्वी वाटचाल करणे सोपे झाले. बँकेने या आर्थिक वर्षात सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पावले उचलतानाच एकूण प्रगतीत समाधानकारक वाटचाल केल्याचे बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तालुक्याचा विकास व बँकांच्या हितासाठी रिफायनरी प्रकल्प या तालुक्यात मार्गी लागला पाहिजे, या हेतूने बँकेने रिफायनरी व्हावी म्हणून तसा ठराव केल्याचेही ते म्हणाले.

भविष्यात हातिवले व भू येथे बँकेचे विस्तारित कक्ष सुरू करतानाच सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत आणण्यासाठी बँकेने पावले उचलली असून, लवकरच बँकेचे फिरते एटीएम सेंटर ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही अभ्यंकर यांनी सांगितले.

या आर्थिक वर्षात बँकेने एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखतानाच २ कोटी ५० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. ६३ कोटींची वाढ करत ३०८.५७ कोटींचा ठेवींचा टप्पा गाठला आहे. कर्जव्यवहारांमध्येही वाढ करताना १८७.४६ कोटी इतका कर्जपुरवठा करत ठेवी आणि कर्ज वितरणाचा चढता रेशो कायम राखला आहे. कोरोना संकटकाळातही बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांनी दाखविलेल्या दृढ विश्वासामुळेच बँकेने आपली ही यशस्वी घोडदौड कायम राखल्याचे बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी सांगितले.

राजापूर अर्बन बँकेच्या १०० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभुमीवर बुधवारी बँकेच्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अभ्यंकर व अहिरे यांनी बँकेच्या सन २०२०-२१ या वर्षातील प्रगतीबाबत बँकेच्या साधलेल्या प्रगतीची माहिती दिली. तर यावर्षीही १०० वी सर्वसाधारण सभा प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाइन पद्धतीने होत असल्याची माहिती दिली.

ग्राहकांना अत्याधुनिक सेवा पुरविताना सायबर सुरक्षिततेबाबतही अधिकाधिक खबरदारी घेतली जात आहे. २४ तास सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, संचालक हनिफ काझी, संजय ओगले, विजय पाध्ये, प्रसाद मोहकर, अनामिका जाधव, राजेंद्र कुशे, कर्मचारी प्रतिनिधी संचालक रमेश काळे, दिलीप दिवटे आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन व आभार बँकेचे एसडीओ प्रसन्न मालपेकर यांनी मानले.

...................

प्रकल्प आलेच पाहिजेत

राजापूर तालुक्यात औद्योगिक क्रांती होणे आवश्यक आहे, तरच भविष्यात बँकांनाही आर्थिक प्रगती साधणे अधिक शक्य होणार आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरीसारखा प्रकल्प झाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका जयंत अभ्यंकर यांनी मांडली. वैयक्तिक मते वेगळी असू शकतात; मात्र एका बँकेचा अध्यक्ष या नात्याने विचार केला तर आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती यासाठी अशा प्रकल्पांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The bank's positive performance during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.