गणपतीपुळेत बंदी, पर्यटकांनी काजीरभाटी समुद्रकिनारी लुटला मनसोक्त आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 02:39 PM2021-11-24T14:39:18+5:302021-11-24T14:47:35+5:30
तन्मय दाते रत्नागिरी : काेराेनाच्या संसर्गामुळे पर्यटनस्थळे बंद हाेती. त्यामुळे काेकणात येऊन समुद्रस्नानाचा आनंद घेण्यावर निर्बंध आले हाेते. शासनाकडून ...
तन्मय दाते
रत्नागिरी : काेराेनाच्या संसर्गामुळे पर्यटनस्थळे बंद हाेती. त्यामुळे काेकणात येऊन समुद्रस्नानाचा आनंद घेण्यावर निर्बंध आले हाेते. शासनाकडून मंदिर खुली केल्याने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अनेकांनी गणपतीपुळेला भेट दिली. मात्र, येथील समुद्रात जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याने पर्यटकांना समुद्र स्नानाचा आनंद लुटता आला नाही. त्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेपासून जवळच असणाऱ्या काजीरभाटी येथील समुद्रकिनारी स्नानाचा आनंद घेतला.
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे याठिकाणी विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी आले हाेते. भाविकांची हाेणारी गर्दी लक्षात घेऊन याठिकाणी पाेलिसांचा कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर होती. त्यातच गणपतीपुळे येथे समुद्रात माैजमस्ती करताना काेणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी समुद्रात जाण्यास बंदी घातली हाेती. याठिकाणी पाेलिसांचा करडा पहारा ठेवण्यात आला हाेता.
गणपतीपुळे येथे पोहण्यासाठी बंदी असल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेपासून जवळच असणाऱ्या काजीरभाटी याठिकाणी गर्दी केली होती. काही पर्यटकांनी किनाऱ्यावर दुचाकी फिरवण्याचाही आनंद लुटला. गेल्या दीड वर्षानंतर समुद्रकिनारे पर्यटकांना माेकळे झाल्याने पर्यटकांनी मनसाेक्त पाेहण्याचा आनंद घेतला.