भरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:13 PM2021-01-29T12:13:32+5:302021-01-29T12:14:46+5:30
Accident Ratnagiri- ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
रत्नागिरी : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथील राजेश आणि ऋतुजा आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन रत्नागिरीतील रुग्णालयात आले होते. तेथून आपली इतर कामे आटोपून ते झरेवाडीकडे जात होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते हातखंबा येथे पोहोचले.
हातखंबा गावातील बसथांब्यावर तेव्हा एक आरामबस उभी होती. एक ट्रक (एमएच ४२- टी १३०१) या बसला ओव्हरटेक करून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. या ट्रकने धुमक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी जवळजवळ २०० मीटर ट्रकसोबत फरपटत गेली. दुचाकीवरील राजेश, ऋतुजा आणि साई हे तिघेही फेकले गेले.
गंभीर दुखापत झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. ऋतुजा आणि साईश हे दोघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने साईशची प्राणज्योत मालवली. ऋतुजा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.
मुलाला आणले होते रुग्णालयात
राजेश धुमक आणि ऋतुजा हे दाम्पत्य मुलाला घेऊन रत्नागिरीला रुग्णालयात उपचारासाठी आले होते. रुग्णालयातील काम आटोपून ते घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर त्यांची बॅग जवळच पडली होती. फरफटत गेलेल्या दुचाकीचा व त्याच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. त्यामुळे या गाडीचा नंबरही मिळू शकला नाही.
ट्रकचालकाचा पळण्याचा प्रयत्न
अपघातानंतर ट्रकचालक शेखर राजेंद्र कोंडे (रा. सोनाळवाडी, अहमदनगर) जंगलातून पळत होता. महामार्गावर ईश्वर ढाब्यानजीक त्याला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तो ट्रकमधून साखरेची पोती घेऊन जयगडकडे जात होता.