बाजारपेठेत बाप्पाने आणले चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:59+5:302021-09-19T04:31:59+5:30

कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन सण अत्यंत उत्साहाने साजरे होतात. होळीच्या दिवसात बाजारपेठेला ...

Bappa brought Chaitanya to the market | बाजारपेठेत बाप्पाने आणले चैतन्य

बाजारपेठेत बाप्पाने आणले चैतन्य

Next

कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन सण अत्यंत उत्साहाने साजरे होतात. होळीच्या दिवसात बाजारपेठेला फारशी चालना मिळत नाही. पण गणेशोत्सवात मात्र बाजारपेठेला मोठा आधार मिळतो. या वेळी १५ ऑगस्टपासून सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे बाजारपेठ रात्री आठ वाजेपर्यंत उघडी राहण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचा खूप मोठा फायदा झाला. सर्वच ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे क्षण आले ते गणेशोत्सवामुळेच.

तिसरी लाट येणार, अशी चर्चा दुसरी लाट तीव्र असतानाच सुरू होती. त्यामुळे गणेशोत्सव धडपणे साजरा करता येईल की नाही, अशी भीती आधीपासून होती. पण सुदैवाने कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आणि म्हणून बाजारावरचे निर्बंधही कमी झाले. त्यामुळेच मुंबईकरांच्या येण्याचा मार्गही मोकळा झाला. चाकरमानी येणार म्हटल्यावर बाजारपेठेला चैतन्य येणार, हेही निश्चित झाले.

.............................

रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. या मूर्तिकामातूनच जवळपास ३ ते ४ कोटींची उलाढाल झाली आहे. कोरोनामुळे लोकांच्या उत्पन्नावर मर्यादा आली असली तरी गणपती बनवण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाले असल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. त्यातून झालेली उलाढाल खूप मोठी आहे.

..................

गणपतीसाठी आरास करण्याची प्रथा शेकडो वर्षांची जुनी. पूर्वी आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेलीझुडपांचा वापर होत होता. त्याला रत्नागिरी जिल्ह्यात मंडपी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात माटवी म्हणतात. त्याला शेरवाडे, सोनतळ, आगलावी (अग्निशिखा), कळलावी, कौंडाळं यांचा समावेश त्यात असायचा. आता काळानुसार त्यात बदल झाले आणि मंडपीची जागा कृत्रिम/तयार साहित्याने घेतली आहे. वेगवेगळ्या प्रकारची मखरे हा आता सजावटीचा मुख्य भाग झाला आहे. आधी त्यासाठी थर्माकोलचा वापर केला जात होता. मात्र आता थर्माकोलच्या वापरावर बंदी असल्याने कापडी मखर केले जाते. त्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय आहेत. एकच मखर सातत्याने वापरले जात नाही. दरवर्षी वेगळे मखर वापरले जाते. त्यामुळे त्यातून दरवर्षी मोठी उलाढाल होते. यंदाही हा बाजार तेजीत होता.

............................

गणपतीचे पूजा साहित्य आणि मिठाई या दोन गोष्टी तर सर्वात महत्त्वाच्या. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते २१ दिवसांच्या गणपतीपर्यंत प्रत्येक वेळी लागणाऱ्या पूजा साहित्य विक्रीतून मोठी उलाढाल होते. वाती, कापूर, वस्त्र, हळद-पिंजर, सुकामेवा याची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होते. गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदकाच्या आकाराचे पेढे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. दुसऱ्याकडे गणपती दर्शनाला जाताना मिठाई नेण्याची पद्धत आहे. त्यासाठी होणारा खपही खूप मोठा आहे. त्यामुळे मिठाई विक्रीनेही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.

.........................

बाजारपेठ बंद असल्याने दुकानदारांची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. कोरोनामुळे घराघरातले अर्थकारण बदलले आहे. लोकांनी आपले खर्च आटोक्यात आणले आहेत. मात्र गणेशोत्सवात लोकांनीही खर्चाची मर्यादा वाढवली. वर्षातून एकदाच येणारा आणि सर्वात लाडका सण असल्याने त्यासाठी लोकांनी खर्चावर बंधने ठेवली नाहीत. त्यामुळेही बाजारपेठेला चांगली चालना मिळाली आहे.

Web Title: Bappa brought Chaitanya to the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.