‘मोरया’ च्या गजरात रत्नागिरीत लाडक्या बाप्पाला निरोप 

By मेहरून नाकाडे | Published: September 23, 2023 06:15 PM2023-09-23T18:15:18+5:302023-09-23T19:05:53+5:30

रत्नागिरी : गेले चार दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जनाने झाली. ढोल ताशे, बँडपथक, बेंजोच्या तालावर मिरवणुका ...

Bappa immersion in chants of Ganpati Bappa Morya | ‘मोरया’ च्या गजरात रत्नागिरीत लाडक्या बाप्पाला निरोप 

‘मोरया’ च्या गजरात रत्नागिरीत लाडक्या बाप्पाला निरोप 

googlenewsNext

रत्नागिरी : गेले चार दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जनाने झाली. ढोल ताशे, बँडपथक, बेंजोच्या तालावर मिरवणुका काढत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ च्या जयजयकारात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील एक लाख १५ हजार २३४ घरगुती व १७ सार्वजनिक गणेशमूर्तीबरोबर गौरींचेही विसर्जन सर्वत्र करण्यात आले.

भाद्रपद चतुर्थीला एक लाख ६६ हजार ९८६ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. चार दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरीसह मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने शहरातील मांडवीसह जिल्ह्यातील प्रमुख विसर्जनस्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चौथ्या दिवशी गौरीसमवेत विसर्जन करणाºया गणेशमूर्तींची संख्या मात्र जिल्ह्यात सर्वाधिक होती. रात्री १२ वाजेपर्यंतच मिरवणूकीत वाद्य वाजविण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याने तत्पूर्वी विसर्जनासाठी भाविकांची घाई झाली होती. त्यामुळे विसर्जन घाटावर भाविकांची गर्दी फुलली होती.

दुपारी आरतीनंतर अनेक भाविकांनी गणेशमूर्ती मखरातून बाहेर काढल्या होत्या. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असल्याने सवाद्य विसर्जन मिरवणूका, गुलालाची उधळण करीत काढण्यात आल्या. हातगाडी, रिक्षा, कार, बोलेरो, टेम्पो, ट्रकमधून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होत्या. ग्रामीण भागात तर महिला पुरूषांनी डोक्यावर गणेशमूर्ती घेतली होती.

काही भाविक निरोपाची आरती घरून करून आले होते तर काही भाविकांनी विसर्जन घाटावर आरती केली. शहरातील मांडवी किनाऱ्यावर विसर्जनासाठी भाविकांची दुपारपासूनच ये-जा सुरू होती. विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. निर्माल्य संकलनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

समुद्रकिनाऱ्यावर गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी खास काही मंडळी कार्यरत होती. त्यामुळे भाविक आरती केल्या नंतर संबंधित मंडळीकडे गणेशमूर्ती सुपूर्द करीत होते. निर्माल्य संकलनासाठी खास स्वयंसेवक कार्यरत होते. सामाजिक संस्थाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. नगर परिषदेतर्फे निर्माल्य संकलनासाठी खास कलशकुंड, वाहनांची व्यवस्था मांडवी किनाऱ्यावर केली होती. मांडवी किनाऱ्यावर वाहनांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पार्किंग अन्यत्र करण्याची पोलिस सूचना करीत होते. फक्त गणेशमूर्ती घेवून जाणाऱ्या वाहनांना किनाऱ्यापर्यंत जाण्याची सूचना करण्यात आली होती.

परतीसाठी एसटी सुविधा

गौरी गणपती सणासाठी मुंबई-पुण्याहून आलेले काही भाविक विसर्जनानंतर लगेचच परतीच्या प्रवासाला निघाले होते. आधीच एसटी, कोकण रेल्वे, खासगी गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. रत्नागिरी विभागातील २१३ बसेस मुंबईसाठी शनिवारी सायंकाळी रवाना झाल्या. कोकण रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी झाली होती.

चिपळुणात 32 हजार गणरायांना निरोप

चिपळूण : ढोल ताशांचा गजर.. टाळ  मृदंगाचा निनाद, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि जलधारांच्या वर्षावात पाच दिवसांच्या गौरी  गणपतीचे शनिवारी मोठया उत्साहात विसर्जन करण्यात आले. शहर परिसरात असलेल्या वाशिष्टी नदीमध्ये व ग्रामीण भागात ठिकठिकाणीच्या नैसर्गिक जलस्त्रोतांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

तालुक्यातील ग्रामीण भागात देखील शनिवारी दुपारी 3 वाजल्या पासून विसर्जन सुरू झाले. सावर्डे परिसरामध्ये १०२४०,अलोरे परिसर ५८५०  तर चिपळूण परिसरात १६५४०  गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. शहरातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या गणेश विसर्जन स्थळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी भेट देऊन नागरिकांना स्वच्छतेविषयी प्रोत्साहीत केले. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Bappa immersion in chants of Ganpati Bappa Morya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.