अनंत चतुर्दशीला बाप्पांचे शांततेत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:14+5:302021-09-21T04:35:14+5:30
रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत रत्नागिरी जिल्हावासीयांनी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला. जिल्ह्यात ...
रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत रत्नागिरी जिल्हावासीयांनी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला. जिल्ह्यात ४९ सार्वजनिक, तर ३३,५६३ खासगी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरीत मांडवी किनारी गणेशभक्तांनी कोरोनाचे नियम पाळत बाप्पांचे विसर्जन केले. पाचपेक्षा अधिक लोकांना सोडण्यात येत नव्हते. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलीस दलाकडून नागरिकांना बंधने घालण्यात आली होती. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये, पांढरा समुद्र या ठिकाणी विसर्जनासाठी नागरिक आले होते. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसातही काही नागरिकांनी बाप्पांचे विसर्जन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवी येथे संपूर्ण बाप्पांचे विसर्जन होईपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने व त्यांचे पथक बंदोबस्ताला होते. या ठिकाणी बॉम्ब शोधपथकही तैनात ठेवण्यात आले होते.
शहरानजीकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मांडवी किनारी निर्माल्य एकत्र करण्यास मदत केली. नगर परिषद प्रशाासनामार्फतही निर्माल्य मदत केंद्र उभे करण्यात आले होते. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तांकडून निर्माल्य घेतले जात होते.
.......................
लहानांनी घेतला आनंद
कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणे बंद असल्याने लहान मुलांना बाहेर घेऊन जायला बंदी होती. गणपती विसर्जनामुळे आलेल्या लहान मुलांनी बाप्पांच्या विसर्जनानंतर लहान मुलांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला.