बारसू पेटलं! स्थानिकांचा उद्रेक, पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 03:12 PM2023-04-28T15:12:53+5:302023-04-28T15:40:32+5:30
लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रूधुर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृतीही ढासळली.
रत्नागिरी - बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. परंतु ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रिफायनरी विरोधात मोर्चा काढण्याचं ठरवले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक जमले होते. या आंदोलनाची तयारी करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिकांचा उद्रेक पाहायला मिळाला.
बारसू येथे महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला.
लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रूधुर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृतीही ढासळली. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे माणसांची पळापळ झाली. अश्रू धुर सोडल्याने लोकांना चालता येत नव्हते. समोरचे दिसायचे बंद झाले. अनेकांच्या डोळ्यांना जळजळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वेक्षण स्थळावरून लोकांना हटवले.
दरम्यान, गेल्या ३-४ दिवसांपासून प्रशासन तिथल्या लोकांची चर्चा करतेय. त्यात संवाद झाला आहे. परंतु काही लोकांना हे रुचत नाही. भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काहीजण राजकारण करायचा प्रयत्न करतंय. चर्चेला सरकार कालही तयार होते, आजही तयार आहे. भविष्यातही तयार आहोत. शेतकऱ्यांना डावलून सरकार प्रकल्प पुढे रेटणार नाही, गावागावांत जाऊन प्रशासन लोकांच्या शंका दूर करेल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राजापूरच्या गेस्टहाऊसमध्ये कुणी बैठक घेतली?
काहीजण लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत ते थांबवावे. शेतकऱ्यांना पुढे करून ज्यापद्धतीने राजकारण केले जातेय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक राजकारण आहे. खासदारांना काय शंका असतील त्या दूर करू. सर्वेक्षणाठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला तयार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू शकतात. पण लोकांची माथी भडकावू नका. राजापूरच्या गेस्टहाऊसला कुणाची बैठक झाली? यामागचे षडयंत्र काय हे समोर आणा. पोलीस आक्रमक झालेत हे दाखवून द्यायचे आहे. स्थानिक कमी बाहेरचे जास्त आहेत. लोकांचा वापर करून राजकारण केले जातेय हे थांबवावे असंही पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.