बारसूत झटापट, अश्रूधुराचा मारा; पाेलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:02 AM2023-04-29T07:02:49+5:302023-04-29T07:03:18+5:30
ग्रामस्थांचा सर्वेक्षण राेखण्याचा प्रयत्न, पाेलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर (जि. रत्नागिरी) : दोन दिवस शांततामय मार्गाने रिफायनरीविरोधी आंदोलन करणाऱ्या बारसू ग्रामस्थांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. भू-सर्वेक्षण रोखण्यासाठी दुपारी प्रतिबंधित सर्वेक्षण क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी आधी अश्रुधुराची नळकांडी फोडली व नंतर त्यांना ताब्यात घेतले. चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, त्यांनी काम थांबविण्याबाबत ठोस घोषणा न केल्याने आंदोलक निघून गेले.
दरम्यान, सरकारने माती परीक्षणाचे काम थांबवावे यासाठी तीन दिवसांची मुदत देत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा ग्रामस्थांनी केली. तीन दिवसांत काम थांबले नाही, तर पुन्हा आंदाेलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सकाळी खासदार राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ग्रामस्थांनी प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. त्यामुळे काहीजणांचे डोळे चुरचुरले, श्वास घेताना त्रास होऊ लागला.
विनायक राऊत यांना ताब्यात घेऊन सोडले
मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले खासदार विनायक राऊत यांना सकाळच्या सत्रात ताब्यात घेण्यात आले होते. सायंकाळी साडेचार वाजता त्यांना सोडण्यात आले.
वालम यांना जिल्हाबंदी
रिफायनरीविराेधी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि बळी राज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम आणि त्यांचा मुलगा विनेश या दोघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांचा जामीन मंजूर झाला. त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली.
सौ चुहे खाकर बिल्ली...
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे माध्यमांशी बाेलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसू प्रकल्पासाठी पत्र दिले होते. आता त्यांनी पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र तेच विरोध करत आहेत. हा ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ असाच प्रकार आहे.
चर्चा करूनच मार्ग काढणार : मुख्यमंत्री
n बारसू रिफायनरीला ७० टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिकांचा पाठिंबा आहे. उर्वरित शेतकऱ्यांशी उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः चर्चा करत आहेत. या प्रकल्पाची पुढील प्रक्रिया स्थानिकांवर अन्याय करून जबरदस्तीने केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत माध्यमांना सांगितले.
n हा प्रकल्प त्या भागातील लोकांना रोजगार देणार आहे. प्रकल्पाचा फायदा कसा होईल हे सांगण्यासाठी सभा घेतल्या जातील, त्यांच्या संमतीनेच प्रकल्प पुढे नेला जाईल, स्थानिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
विराेधकांची टीका
सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल केले तर सरकारलाही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिला. तर ही राक्षसी राजवट आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.